( मुंबई )
वरळी सी-लिंकवरून समुद्रात उडी मारून 51 वर्षीय व्यावसायिकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाण्यातील रहिवासी भावेश मजेडिया यांनी टॅक्सीने प्रवास करत असताना अचानक गाडी थांबवण्यास सांगितले आणि त्यानंतर समुद्रात उडी मारली. बचाव पथकाने शोधमोहीम राबवली, मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, भावेश मजेडिया हे व्यावसायिक होते. ते टॅक्सीने वरळी सी-लिंकवरून प्रवास करत असताना त्यांनी चालकाला, “मला जरा मळमळत आहे, टॅक्सी थांबवा,” अशी विनंती केली. चालकाने वाहन थांबवताच त्यांनी अचानक सी-लिंकवरून समुद्रात उडी मारली.
घटनेनंतर टॅक्सी चालकाने तत्काळ पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र, त्या वेळी जोरदार वारे आणि प्रतिकूल हवामानामुळे शोधकार्याला अडथळे निर्माण झाले. शर्थीच्या प्रयत्नांनंतर त्यांचा मृतदेह शोधण्यात यश आले.
भावेश मजेडिया यांना तातडीने नायर रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. पोलिसांच्या प्राथमिक तपासात आर्थिक तणावातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, आत्महत्येमागील नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

