(ठाणे / उल्हासनगर)
राज्यात प्रेमसंबंधांमुळे होणाऱ्या ऑनर किलिंगच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. अशातच मुंबईजवळील उल्हासनगरमध्ये जन्मदात्या आईनेच आपल्या 19 वर्षीय मुलीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमसंबंधांना विरोध आणि लग्नाच्या वादातून हा प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी दिली असून, आरोपी आईला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना उल्हासनगरमधील भैय्यासाहेब आंबेडकर नगर परिसरात घडली. आरोपी आईचे नाव आशा गरुड असून, मृत मुलीचे नाव अमृता गरुड (वय 19) असे आहे.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, अमृताचे शेजारी राहणाऱ्या एका परजातीतील तरुणावर प्रेम होते. दोघेही एकमेकांवर प्रेम करत होते. मात्र, या नात्याची माहिती कुटुंबीयांना नव्हती. दरम्यान, अमृतासाठी विवाहाचा प्रस्ताव आला होता. मात्र, तिने तो नाकारला. यानंतर आईने नकाराचे कारण विचारले असता, अमृताने शेजारी राहणाऱ्या तरुणावर प्रेम असल्याचे सांगितले. मात्र, संबंधित तरुणाकडे स्थिर रोजगार नसल्याने आणि चांगले स्थळ नाकारल्यामुळे आशा गरुड संतप्त झाल्या. याच कारणावरून घरात वारंवार वाद होत असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
रविवारी रात्री पुन्हा एकदा लग्नाच्या विषयावरून आई-मुलीत जोरदार वाद झाला. पोलिसांच्या माहितीनुसार, वादाच्या भरात आशा गरुड यांनी अमृताची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. वाद विकोपाला गेल्यानंतर अमृता गरुड ही त्या तरुणासोबत घर सोडून पळून जाण्याच्या तयारीत होती. मुलगी ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आणि ती पळून जात आहे हे पाहताच आईचा संयम सुटला. रागाच्या भरात आशा गरुड यांनी जवळच असलेल्या ओढणीने अमृता गरुड हिचा गळा आवळला. यात श्वास गुदमरून तरुणीचा जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर घरात एकच गोंधळ उडाला. अमृताच्या वडिलांनी तातडीने उल्हासनगर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अमृताचा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. त्यानंतर आरोपी आई आशा गरुड हिला तात्काळ अटक करण्यात आली.
या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी आईची चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे उल्हासनगर परिसरात खळबळ उडाली असून, प्रेमसंबंधांना विरोधातून घडलेल्या आणखी एका कथित ऑनर किलिंगच्या घटनेने समाजमन हादरले आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

