(देवळे /प्रकाश चाळके)
संगमेश्वर तालुक्यातील देवरुख पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या घाटीवळे आणि करंजारी गावांत चोरट्यांनी एकाच रात्री पाच बंद घरांना लक्ष्य करत घरफोड्या केल्या. घरांची कुलपे तोडून काही ऐवज लंपास करण्यात आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घाटीवळे गावातील मुसलमानवाडी परिसरात अब्दुल रहमान फोडकर, इकबाल उमर फोडकर आणि अब्दुल मज्जिद शिरगावकर यांची बंद घरे चोरट्यांनी फोडली. घरांची कुलपे तोडून चोरट्यांनी आतील काही ऐवज लंपास केला.
यानंतर चोरट्यांनी घाटीवळेपासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गालगतच्या करंजारी गावाकडे मोर्चा वळवला. तेथे चंद्रकांत शिवराम भुर्के आणि बाबा वळंजु यांच्या घरांना लक्ष्य करण्यात आले. विशेष म्हणजे, ही दोन्ही घरे थेट महामार्गालगत आहेत. भुर्के यांचे घर बंद होते, तर बाबा वळंजु हे काही कामानिमित्त बाहेर गेले असताना त्यांच्या घरात चोरी झाली. या दोन्ही घरांतून सुमारे ५२ हजार रुपयांचा ऐवज लंपास झाल्याचे समजते.
बाबा वळंजु यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. चोरी केल्यानंतर त्यांनी त्याच कडी-कोंड्याला दुसरे कुलूप लावून घटनास्थळावरून पळ काढला. चोरट्यांनी केलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
या घरफोड्यांची माहिती साखरपा पोलिसांना देण्यात आली आहे. एकाच रात्री पाच घरांना लक्ष्य करण्यात आल्याने घाटीवळे-करंजारी परिसरात घबराट पसरली असून, चोरट्यांचा बंदोबस्त करण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.


