(सातारा / वृत्तसंस्था)
सातारा-लातूर राष्ट्रीय महामार्गावरील नेर फाटा (श्रीनिधी पेट्रोलियम) येथे सोमवारी (27 जुलै) मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात मुलीला शिक्षणासाठी पुण्यात सोडून घरी परतणाऱ्या दांपत्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात त्यांचा 16 वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सातारा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे पुसेगावसह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विजय बबनराव भोसले (वय 50), समृद्धी विजय भोसले (वय 45) आणि त्यांचा मुलगा वरद विजय भोसले (वय 16, रा. पुसेगाव, ता. खटाव) हे मारुती सुझुकी फ्राँक्स (MH 11 DN 3580) या कारमधून साताऱ्याकडून पुसेगावकडे परतत होते. त्यांनी आपल्या मुलीला पुढील शिक्षणासाठी पुण्यात सोडल्यानंतर घरी परतण्याचा प्रवास सुरू केला होता. रात्री सुमारे 1.30 वाजण्याच्या सुमारास नेर फाट्यावरील श्रीनिधी पेट्रोल पंपाजवळ समोरून येणाऱ्या आयशर ट्रक (MH 25 AJ 9334) आणि कारमध्ये समोरासमोर भीषण धडक झाली. धडक इतकी जोरदार होती की कारचा चक्काचूर झाला. अपघातात विजय भोसले आणि समृद्धी भोसले यांचा जागीच मृत्यू झाला, तर मुलगा वरद गंभीर जखमी झाला.
अपघाताची माहिती मिळताच पुसेगाव पोलीस आणि स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले. तिघांनाही तातडीने पुसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विजय भोसले आणि समृद्धी भोसले यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले. गंभीर जखमी वरद भोसले याला पुढील उपचारासाठी सातारा जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी आयशर ट्रक चालक समीर बाबू नदाफ (वय 25, रा. तुगाव, ता. उमरगा, जि. धाराशिव) यांनी पुसेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 मधील कलम 106(1), 281, 125(A), 125(B), 324(4) तसेच मोटार वाहन कायदा कलम 184 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुसेगाव पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या अपघाताचा तपास सुरू असून हवालदार कोळेकर पुढील तपास करीत आहेत.
दरम्यान, विजय भोसले हे श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळात वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत होते, तर समृद्धी भोसले या गृहिणी होत्या. शिक्षणासाठी मुलीला पुण्यात सोडून आनंदाने घरी परतत असताना झालेल्या या दुर्दैवी अपघाताने भोसले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून पुसेगाव आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

