(रत्नागिरी / वार्ताहर)
शहरानजीकच्या कुर्ली-फाटा येथील पिकअप शेडजवळ आणि रेल्वेस्टेशन ते कुवारबाव या रस्त्यावरील फुटपाथवर बेशुद्धावस्थेत आढळलेल्या दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. दोघांनाही उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. शनिवारी (दि. २४) सायंकाळी साडेसात ते आठच्या सुमारास ही घटना घडली.
राजू भैरु कुरयाल (वय ५०, मूळ रा. कर्नाटक, सध्या रा. संजीवनी नगर, गोळप, रत्नागिरी) आणि संदीप प्रकाश यादव (वय ३५, रा. चापोली, ता. संगमेश्वर) अशी मृतांची नावे आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजू कुरयाल हे कुर्ली-फाटा येथील पिकअप शेडजवळ बेशुद्धावस्थेत आढळले. तर संदीप यादव हे रेल्वेस्टेशन ते कुवारबाव या अंतर्गत रस्त्यावरील फुटपाथवर बेशुद्धावस्थेत आढळले. दोघांनाही पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
या दोन्ही घटनांप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


