(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र गणपतीपुळे येथील स्वयंभू श्री गणपती मंदिरात कोजागिरी पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर रविवारी दीपोत्सवाला भक्तिभावात आणि उत्साहात प्रारंभ झाला. कोजागिरी पौर्णिमेपासून त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत चालणाऱ्या या दीपोत्सवात दररोज सायंकाळी आरतीच्या वेळी मंदिरात पणत्या प्रज्वलित करून श्रींच्या चरणी सेवा अर्पण केली जाणार आहे.
दीपोत्सवाच्या प्रारंभी गणपती मंदिराचे मुख्य पुजारी अमित घनवटकर, ब्रह्मवृंद, ग्रामस्थ आणि उपस्थित भाविकांनी भक्तिभावाने सेवा अर्पण केली. गणपतीपुळे येथील स्वयंभू श्रींच्या मंदिरात दरवर्षी कोजागिरी पौर्णिमेपासून त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत दीपोत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. यंदाही या परंपरेनुसार दीपोत्सवाला सुरुवात झाली आहे.
या उत्सवात मंदिराचे मुख्य पुजारी, देवस्थानचे कर्मचारी, स्थानिक ग्रामस्थ आणि दर्शनासाठी येणारे भाविक मोठ्या भक्तिभावाने सहभागी होतात. दररोज सायंकाळच्या आरतीवेळी मंदिरातील विजेचे दिवे बंद करून पणत्यांच्या प्रकाशात दीपोत्सव साजरा केला जातो. असंख्य पणत्यांच्या लख्ख प्रकाशाने उजळलेले मंदिर आणि सर्वत्र पसरलेला दिव्यांचा झगमगाट भाविकांचे लक्ष वेधून घेतो. या मनोहारी दृश्यामुळे मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होते.
या दीपोत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक भाविकाला पणत्या लावून श्रींच्या चरणी सेवा अर्पण करण्याची संधी मिळते. त्यामुळे भाविकांचा उत्साह द्विगुणित होतो आणि दीपोत्सवात सहभागी होण्याचा आनंद अधिक वाढतो.
कोजागिरी पौर्णिमेला सुरू झालेल्या या दीपोत्सवाची सांगता त्रिपुरारी पौर्णिमेला होणार आहे. तोपर्यंत दररोज सायंकाळी पणत्यांच्या प्रकाशात उजळणाऱ्या गणपती मंदिरात भक्तिभावाचे वातावरण अनुभवता येणार आहे.


