( नवी दिल्ली )
यंदाच्या प्रजासत्ताक दिनी नवी दिल्लीतील कर्तव्यपथावर झालेल्या भव्य संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाने प्रथम क्रमांक पटकावत सर्वोत्कृष्ट चित्ररथाचा मान मिळवला आहे. गणेशोत्सव या सांस्कृतिक संकल्पनेवर आधारित महाराष्ट्राच्या चित्ररथाला परीक्षकांनी सर्वाधिक गुण देत पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक जाहीर केले आहे. द्वितीय क्रमांक जम्मू-काश्मीर, तर तृतीय क्रमांक केरळ राज्याच्या चित्ररथाला मिळाला आहे. केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयाकडून या पुरस्कारांची अधिकृत घोषणा करण्यात आली.
यंदा महाराष्ट्राने ‘गणेशोत्सव: आत्मनिर्भरतेचे प्रतीक’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथ सादर केला होता. या चित्ररथाच्या माध्यमातून महाराष्ट्राची समृद्ध लोकसंस्कृती, गणेशोत्सवाचा सामाजिक वारसा आणि त्यातून मिळणारा आर्थिक रोजगार व आत्मनिर्भरतेचा संदेश अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात आला होता. चित्ररथावरील भव्य गणेशमूर्ती, पारंपरिक ढोल-ताशा पथक आणि लेझीम खेळणाऱ्या कलाकारांच्या उत्साहाने कर्तव्यपथ दुमदुमून गेला होता. याच प्रभावी सादरीकरणामुळे परीक्षकांनी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या गटातून महाराष्ट्राच्या चित्ररथाला सर्वोत्तम चित्ररथ म्हणून निवडले आहे. केवळ राज्यांच्या श्रेणीतच नव्हे, तर इतर विभागांतही चुरस पाहायला मिळाली.
प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर महाराष्ट्र राज्याच्या वतीने सादर करण्यात आलेल्या चित्ररथातून गणेशोत्सवाची परंपरा, सामाजिक एकोपा आणि सांस्कृतिक समृद्धी प्रभावीपणे मांडण्यात आली होती. या चित्ररथाची संकल्पना आणि रचना तुषार प्रधान, रोशन इंगोले, कृष्णा सालवटकर आणि श्रीपाद भोंगाडे यांनी साकारली होती. त्यांच्या कलात्मक मांडणीने देशभरातील प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.
यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये एकूण ३० चित्ररथ सहभागी झाले होते, यामध्ये १७ राज्ये आणि केंद्र सरकारच्या १३ विभागांचे चित्ररथ समाविष्ट होते. “स्वातंत्र्याचा मंत्र – वंदे मातरम्” आणि “समृद्धीचा मंत्र – आत्मनिर्भर भारत” ही यंदाच्या संचलनाची मध्यवर्ती संकल्पना होती.
प्रजासत्ताक दिनाच्या संचलनासाठी कोणत्या राज्याचा चित्ररथ सहभागी होणार, याचा निर्णय एका विशेष समितीमार्फत घेतला जातो. या समितीत नामवंत कलाकार, विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ तसेच पद्म पुरस्कार विजेते सदस्य असतात. दरवर्षी आलटून-पालटून राज्यांच्या चित्ररथांना या राष्ट्रीय परेडमध्ये सहभागी होण्याची संधी दिली जाते.
महाराष्ट्राच्या पुरस्कारप्राप्त चित्ररथाची रचना अत्यंत लक्षवेधी होती. चित्ररथाच्या अग्रभागात पारंपरिक वेशभूषेत एक महिला भव्य ढोल वाजवताना दाखवण्यात आली असून ती उत्सवातील ऊर्जा आणि आनंदाचे प्रतीक आहे. मध्यभागात शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती साकारणारा मूर्तिकार आणि विसर्जनासाठी मूर्ती डोक्यावर घेऊन जाणारा गणेशभक्त साकारण्यात आला आहे. तर पृष्ठभागावर अष्टविनायकांच्या मंदिरांची प्रतिकृती उभारून महाराष्ट्राच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडवण्यात आले आहे.
राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राच्या चित्ररथाला मिळालेल्या या सन्मानामुळे राज्याच्या सांस्कृतिक ओळखीला आणि गणेशोत्सवाच्या परंपरेला नवी उंची मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

