(देवरूख / वार्ताहर)
संगमेश्वर तालुक्यातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. देवरूख येथील ५० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्याच्या मागणीला महत्त्वपूर्ण गती मिळाली असून, आरोग्य सेवा आयुक्तालयाने याबाबतचा प्रस्ताव सार्वजनिक आरोग्य विभागाकडे पाठवत शासनाने आवश्यक निर्णय घ्यावा, अशी शिफारस केली आहे.
देवरूखच्या नगराध्यक्षा सौ. मृणाल अभिजित शेट्ये यांनी या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्याची दखल घेत आरोग्य सेवा आयुक्तालयाने १६ जुलै २०२६ रोजीच्या अधिकृत पत्राद्वारे हा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. संबंधित पत्रात नगराध्यक्षा शेट्ये यांनी केलेल्या मागणीचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला असून, शासनाने यावर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती करण्यात आली आहे.
देवरूख ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर झाल्यास परिसरातील नागरिकांना अधिक सक्षम आणि दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध होणार आहे. यामध्ये तज्ज्ञ डॉक्टर, अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी, अत्याधुनिक उपचार सुविधा आणि वाढीव उपचार क्षमता उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे संगमेश्वर तालुक्यासह परिसरातील हजारो नागरिकांना मोठा लाभ मिळणार आहे.
नगराध्यक्षा सौ. मृणाल शेट्ये यांनी नागरिकांच्या आरोग्य सुविधांचा प्रश्न प्राधान्याने शासनाकडे सातत्याने मांडला. त्यांच्या या प्रयत्नांना आता सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने रुग्णालयाच्या श्रेणीवर्धनाचा मार्ग मोकळा होण्याची आशा व्यक्त केली जात आहे.
यापुढील टप्प्यात शासनाकडून अंतिम मंजुरी मिळावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे, पालकमंत्री डॉ. उदय सामंत, आमदार शेखर निकम, विधान परिषद सदस्य प्रमोद जठार, आमदार किरण (भैय्या) सामंत तसेच भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्षा सौ. मृणाल शेट्ये यांनी दिली.
देवरूखच्या आरोग्य सुविधांच्या उन्नतीसाठी हा महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, शासनाच्या अंतिम निर्णयानंतर संगमेश्वर तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

