(देवळे / प्रकाश चाळके)
कोकणातील काजू उद्योगाला जागतिक बाजारपेठेत पोहोचवण्याच्या उद्देशाने सुपर सॉनिक डिस्ट्रीब्यूशन अँड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या बहुराष्ट्रीय मल्टी प्रॉडक्ट कंपनीकडून रत्नागिरी जिल्ह्यातील काजू उत्पादक व उद्योजकांसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही सभा आज (बुधवार दि. ५ नोव्हेंबर २०२५ रोजी) सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत हॉटेल सावंत पॅलेस, रत्नागिरी येथे होणार आहे.
३० वर्षांचा समृद्ध अनुभव आणि ३०० कोटी रुपयांपेक्षा अधिक उलाढाल असलेली सुपर सॉनिक डिस्ट्रीब्यूशन अँड सर्व्हिसेस प्रा. लि. ही कंपनी असुदामल ग्रुप (उलाढाल रु. ४,००० कोटीपेक्षा अधिक) यांच्या दृढ पायावर उभी आहे. कंपनी कोकणातील काजू उद्योगाला ‘मेड इन कोकण’ या जागतिक दर्जाच्या ब्रँड म्हणून उभे करण्याचा संकल्प घेऊन पुढे सरसावली आहे. या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट स्थानिक काजू उत्पादकांना जागतिक बाजाराशी जोडणे, कोकणातील काजू उद्योगाला बळकटी देणे आणि ‘मेड इन कोकण’ या संकल्पनेला जागतिक मान्यता मिळवून देणे असे आहे.
कार्यक्रमाचे ठळक मुद्दे – शंभर टक्के भागीदारीची संधी, फक्त व्यापार नव्हे तर विश्वासाचे नाते, मिडल ईस्ट, आशिया, युरोप, यूके आणि आफ्रिका या देशांतील बाजारातील दर व मागणीची सविस्तर माहिती, सातत्य, गुणवत्ता आणि उत्पादनवाढ याबाबत पूर्ण सहकार्य तसेच आरसीएन प्रोसेस व काजू व्यापारासाठी व्यावसायिक भागीदारी.
या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती म्हणून सुपर सॉनिकचे बिझनेस हेड आनंद ढबू, महाराष्ट्र काजू प्रोसेसिंग फेडरेशनचे अध्यक्ष धनंजय यादव, रत्नागिरी जिल्हा काजू संघाचे माजी अध्यक्ष विवेक बारगीर, विद्यमान अध्यक्ष संदेश पेडणेकर, महाराष्ट्र काजू असोसिएशनचे संचालक संदेश दळवी, उर्मिला काजू फॅक्टरीचे मालक विराज घोसाळकर आणि एपीएमसीचे संचालक ओंकार कोलते उपस्थित राहणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व काजू उत्पादक, उद्योजक आणि व्यापाऱ्यांनी या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

