(संगमेश्वर /प्रतिनिधी)
तालुकास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, कसबा येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. त्यामुळे कसबा हायस्कूलच्या क्रीडापटूंचा आत्मविश्वास उंचावला असून, ठिकठिकाणी त्यांचे अभिनंदन होत आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, रत्नागिरी जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने साडवली येथील कै. मीनाताई ठाकरे विद्यालयाच्या मैदानावर २७ व २८ सप्टेंबर रोजी या स्पर्धा झाल्या. यामध्ये कसबा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी १९ वर्षे वयोगट आणि १७ वर्षे वयोगटात उल्लेखनीय कामगिरी केली.
१९ वर्षे वयोगटात पार्थ बुदर (१५०० मीटर धावणे), ऋषभ म्हादे (थाळीफेक), प्रणय गोरीवले (हातोडाफेक), सार्थक मालप (तिहेरी उडी) आणि तृप्ती विंजले (भालाफेक) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तर सुजल गिजे (३००० मीटर व १०० मीटर धावणे), प्रेरणा मालप (गोळाफेक व थाळीफेक), सार्थक मालप (उंच उडी) आणि धीरज गुरव (हातोडाफेक) यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. याशिवाय तृप्ती विंजले (हातोडाफेक), धीरज गुरव (भालाफेक), अथर्व गराटे (लांबउडी) आणि ऋणय खापरे (तिहेरी उडी) यांनी तृतीय क्रमांक मिळवला. कसबा विद्यालयाच्या ४x४०० मीटर रिले संघानेही द्वितीय क्रमांक पटकावला.
१७ वर्षे वयोगटात इयत्ता अकरावी कला शिकणाऱ्या अलोक पोमेंडकरने हातोडाफेकमध्ये द्वितीय आणि थाळीफेकमध्ये तृतीय क्रमांक मिळवून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली.
वरील सर्व विजेत्या खेळाडूंची निवड आता रत्नागिरी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे. या यशाबद्दल संस्था अध्यक्ष कॅप्टन अकबर खलपे, उपाध्यक्ष नियाज कापडी व इब्राहिम काझी, सचिव सईद उपाद्ये, सहसचिव शौकतअली खलफे, खजिनदार शिकूर गैबी, प्राचार्य एच. जी. शेख, पर्यवेक्षक एस. ए. पटेल, क्रीडा शिक्षक आर. एच. तांबोळी यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कसबा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारात केलेल्या या कामगिरीमुळे विद्यालय व क्रीडापटूंवर कौतुकाचा वर्षाव होत असून जिल्हास्तरीय स्पर्धेत आणखी चमकदार यश मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

