(रत्नागिरी / अमित कांबळे)
अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याचा प्रस्तावित निर्णय तातडीने रद्द करण्यात यावा, अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा पक्षाच्या रत्नागिरी जिल्हा शाखेने दिला आहे. या मागणीसाठी आरपीआय (आठवले)च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यानंतर जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, राज्य सरकार बदर समितीच्या शिफारशींच्या आधारे अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याचा विचार करीत असून, या निर्णयामुळे अनुसूचित जाती समाजात फूट पडण्याची शक्यता आहे. तसेच सामाजिक न्यायाच्या तत्त्वांना आणि भारतीय संविधानाच्या मूलभूत मूल्यांना धक्का पोहोचू शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनुसूचित जातींना दिलेल्या घटनात्मक आरक्षणाचा उद्देश ऐतिहासिक सामाजिक अन्याय दूर करून समान संधी उपलब्ध करून देणे हा होता. त्यामुळे आरक्षणामध्ये कोणत्याही प्रकारचे उपवर्गीकरण करणे हे समाजहिताच्या विरोधात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदनातील प्रमुख मागण्या
- अनुसूचित जातीच्या आरक्षणामधील उपवर्गीकरणाचा निर्णय तात्काळ रद्द करावा.
- बदर समिती त्वरित रद्द करण्यात यावी.
- अनुसूचित जातींचे घटनात्मक हक्क आणि आरक्षणाचे संरक्षण करावे.
- कोणताही निर्णय घेण्यापूर्वी अनुसूचित जातीतील सर्व घटकांच्या प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा करावी.
- नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणाची गंभीर दखल घेऊन योग्य कारवाई करावी.
- सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीची तातडीने अंमलबजावणी करावी.
सामाजिक न्यायाच्या तत्त्वांचा आदर राखत सरकारने उपवर्गीकरणाचा निर्णय त्वरित मागे घ्यावा. अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) लोकशाही आणि संविधानिक मार्गाने तीव्र आंदोलन उभारेल. त्यातून उद्भवणाऱ्या परिस्थितीस शासन जबाबदार राहील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला.
यावेळी कोकण प्रदेशाध्यक्ष प्रकाश मोरे, युवक कोकण प्रदेशाध्यक्ष सुशांत सकपाळ, जिल्हाध्यक्ष प्रितम रुके, सरचिटणीस आदेश मर्चंडे, तसेच राहुल जाधव, सुरेंद्र तांबे, विलास कांबळे, प्रा. उरुणकर, विक्रांत कदम, उज्ज्वल कांबळे, दीपक कांबळे, ॲड. श्रुती कांबळे, तृप्ती कांबळे, दीप्ती कांबळे यांच्यासह जिल्हा व तालुका पदाधिकारी, ज्येष्ठ सदस्य, युवक कार्यकर्ते आणि अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

