(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर तालुक्यातील लोवले पड्येवाडी येथील श्री स्वामी समर्थ मठाचा २५ वा वर्धापन दिन (श्री स्वामी महाराज प्रकट दिन) आज शुक्रवार, दि. २० मार्च २०२६ रोजी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. प. पू. श्रीपतीबाबा धोंगडे (सांगली) यांच्या प्रेरणेतून स्थापन झालेल्या या मठात दरवर्षीप्रमाणे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या सोहळ्याची सुरुवात काल गुरुवार, दि. १९ मार्च २०२६ (गुढी पाडवा) रोजी झाली असून दुपारी १२.३० ते १.३० वाजता श्री नितीन मनोहर खातू (बाबू खातू) यांच्या निवासस्थानी स्वामींच्या पादुकांवर अभिषेक करण्यात आले. त्यानंतर दुपारी ३.३० वाजता संगमेश्वर बाजारपेठ मार्गे लोवले पड्येवाडी मठापर्यंत स्वामींच्या पादुकांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. रात्री ८ वाजता नित्य आरती झाली.
शुक्रवार, दि. २० मार्च रोजी सकाळी ७ वाजता पादुकांवर अभिषेक व पूजन तसेच श्री दत्तात्रय श्रीपतीबाबा धोंगडे यांच्या हस्ते होमहवन, सकाळी ९.३० वाजता श्री सत्यनारायण महापूजा, ११ वाजता पालखी प्रदक्षिणा, दुपारी १२ वाजता महाआरती व दुपारी १ वाजता अन्नपूर्णा देवी पूजनानंतर अखंड महाप्रसाद अशा धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सायंकाळी ६ ते ८ या वेळेत हरिपाठ (दत्तगुरु प्रासादिक मंडळ, अंदेरी मधलीवाडी) होईल. रात्री ८ वाजता महाआरती व स्वामी भक्तांचे पुण्यस्मरण तसेच उपस्थितांचा सत्कार करण्यात येईल. रात्री
१०.३०.या वेळेत माऊली महिला नमन मंडळ, रत्नागिरी (शहर) यांचे बहुरंगी नमन सादर केले जाणार आहे.
सन २००२ साली प. पू. श्रीपतीबाबा धोंगडे महाराज यांच्या शुभहस्ते या मठात स्वामींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती. तेव्हापासून मठात नित्यपूजा, आरती तसेच स्वामी प्रकट दिन, गुरुपौर्णिमा, दत्त जयंती यांसारखे विविध उत्सव दरवर्षी साजरे केले जातात.
या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त मठाच्या उभारणीत व कार्यात योगदान देणाऱ्या ज्ञात-अज्ञात स्वामी भक्तांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात येणार आहे. तसेच हयात नसलेल्या भक्तांचे पुण्यस्मरणही करण्यात येणार आहे.
या सोहळ्यास सर्व स्वामी भक्तांनी मित्र-परिवारासह उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन स्वामी समर्थ सेवा मंडळ, लोवले पड्येवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमात आवश्यकतेनुसार बदल करण्याचा अधिकार मंडळाने राखून ठेवला आहे.

