(राजापूर / तुषार पाचलकर)
जिल्ह्यातील संभाव्य दुष्काळी परिस्थिती आणि पाणीटंचाईचा आढावा घेण्यासाठी राजापूर तालुक्यातील पाचल मंडळात आज (सोमवार, २६ ऑक्टोबर) रोजी संयुक्त आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. पाचल ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहात सकाळी ११ वाजता झालेल्या या बैठकीला विविध विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि मंडळातील ग्रामपंचायतींचे पदाधिकारी उपस्थित होते.
उपविभागीय अधिकारी, राजापूर यांच्या पत्रानुसार तसेच २२ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या पाणीटंचाई संयुक्त आढावा संदर्भातील आदेशान्वये ही बैठक आयोजित करण्यात आली होती. उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली १७ ऑक्टोबर २०२६ रोजी दुष्काळी परिस्थिती आणि पाणीटंचाईबाबत झालेल्या आढावा बैठकीत देण्यात आलेल्या सूचनांच्या अनुषंगाने पाचल मंडळात संयुक्त भेटी घेऊन परिस्थितीचा आढावा घेण्याचे निर्देश देण्यात आले होते.
या अनुषंगाने तहसीलदार विकास गमरे, राजापूरचे गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी तसेच ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता यांच्या संयुक्त सहभागातून मंडळनिहाय आढावा घेण्याचे नियोजन करण्यात आले.
या बैठकीला जिल्हा परिषद सदस्या सिद्धाली मोरे, पंचायत समिती सदस्य अविनाश पराडकर, अपेक्षा मासये, समीक्षा वाफेलकर, पाचलचे उपसरपंच आत्माराम सुतार यांच्यासह मंडळातील सरपंच, ग्रामविकास अधिकारी, ग्राममहसूल अधिकारी, मंडळ अधिकारी आणि तलाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


