(संगमेश्वर / मकरंद सुर्वे)
सांगमेश्वर तालुक्यातील कडवई येथील भाईशा घोसाळकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी धनुर्विद्या स्पर्धेत जिल्हास्तरावर यश मिळवल्यानंतर उद्या सातारा येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी सहा विद्यार्थ्यांचा संघ आज रवाना झाला आहे. या विद्यार्थ्यांना मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
सप्टेंबर महिन्यामध्ये डेरवण येथे झालेल्या जिल्हास्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत भाईशा घोसाळकर हायस्कुल कडवई चे अकरा विद्यार्थी विभागासाठी पात्र ठरले होते. रत्नागिरी, सिधुदुर्ग, सांगली, सातारा, कोल्हापूर व सांगली या जिल्ह्यातील पात्र खेळाडूंसाठी सातारा येथे उद्यापासून स्पर्धा सुरू होत आहेत. विभागीय स्तरावर खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेसाठी प्रशिक्षक संतोष साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली आज सहा खेळाडूंचा संघ सातारा येथे रवाना झाला आहे.
या संघात स्वराज चव्हाण, क्षितिज सरमोकदम, साइराज सुर्वे, परिणीती कांबळे, स्वरा इंजले व आर्या जोयशी यांचा समावेश आहे. त्यांच्यासोबत प्रशिक्षक संतोष साळुंके यांच्यासह शिक्षक प्रिया सावंत व पालक प्रियांका कांबळे याही आहेत. या संघाला संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत यलगुडकर, सचिव वसंत उजगावकर, मुख्याध्यापक शेषेराव अवघडे, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष मिलिंद चव्हाण, मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण, वरदान देवी देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष संजय घोसाळकर, माजी विद्यार्थी गणेश सुर्वे आदींनी शुभेच्छा दिल्या.

