(रत्नागिरी / वार्ताहर)
सिंधुरत्न समृद्ध योजनेच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटन, मत्स्यव्यवसाय आणि कृषी प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहेत. भाट्ये येथे हाऊसबोट टर्मिनल उभारून पर्यटकांसाठी हाऊसबोट सेवा सुरू करण्यात येणार असून, २५ कोटी रुपये खर्चून आधुनिक मत्स्यालय उभारण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. तसेच काजू बोंडापासून ज्यूस, सिरप आणि इतर मूल्यवर्धित उत्पादने तयार करणारे प्रक्रिया उद्योग २५ बचतगटांच्या क्लस्टरच्या माध्यमातून उभारण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात सोमवारी झालेल्या सिंधुरत्न समृद्ध योजना कार्यकारी समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी समितीचे उपाध्यक्ष तथा माजी आमदार विनय नातू, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, जिल्हा नियोजन अधिकारी निवास यादव यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत डॉ. सामंत यांनी सिंधुरत्न योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांचा सविस्तर आढावा घेतला. विविध विभागांकडे उपलब्ध निधी, पूर्ण झालेली कामे, अपूर्ण प्रकल्पांची कारणे आणि त्यांची सद्यस्थिती याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. ते म्हणाले की, शेतकऱ्यांना अधिक उत्पादन देणाऱ्या बांबूच्या जाती उपलब्ध करून देण्यासाठी संशोधन व सुविधा केंद्र उभारण्याची आवश्यकता आहे. तसेच काजू बोंडावर आधारित प्रक्रिया उद्योगांच्या माध्यमातून ज्यूस, सिरप आणि इतर मूल्यवर्धित उत्पादने तयार करण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात यावा.
सीएमईजीपी योजनेंतर्गत उपलब्ध असलेल्या ३५ टक्के अनुदानाचा लाभ घेऊन २५ बचतगटांचा क्लस्टर तयार करावा. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, सिंधुरत्न योजना आणि सीएमईजीपी यांच्या समन्वयातून अन्न प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी सविस्तर सादरीकरण तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. वैयक्तिक लाभाच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ नागरिकांपर्यंत पोहोचेल, अशा स्वरूपाचे प्रस्ताव तयार करण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
भाट्ये येथे उभारण्यात येणाऱ्या हाऊसबोट टर्मिनलमुळे जिल्ह्याच्या पर्यटनाला नवी चालना मिळेल. या प्रकल्पातून मिळणारा नफा संबंधित प्रभाग संघांना देण्याची संकल्पनाही यावेळी मांडण्यात आली. याशिवाय, २५ कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणारे मत्स्यालय हे केवळ मत्स्यप्रदर्शन केंद्र न राहता, पर्यटकांना आकर्षित करणारे आधुनिक पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यासाठी दर्जेदार आणि सर्वसमावेशक प्रस्ताव तयार करण्याच्या सूचनाही पालकमंत्री डॉ. सामंत यांनी दिल्या.
नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत प्रस्ताव तयार करताना आरोग्य, क्रीडा, पर्यटन आणि कौशल्य प्रशिक्षण या क्षेत्रांना प्राधान्य देण्याचे निर्देश देत जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक परिणामकारक प्रकल्प सादर करण्याचे आवाहन त्यांनी अधिकाऱ्यांना केले.

