( रत्नागिरी )
भारत जगातील तिसरी अर्थव्यवस्था असलेला देश बनला आहे. भारत महासत्ता होत असताना मराठा समाजानेही तितकेच योगदान दिले पाहिजे. नोकरीपेक्षा उद्योजक व्हावे, त्याकरिता मराठा बिझनेसमन फोरम काम करत आहे. स्पर्धा परीक्षा देण्याकरिता मार्गदर्शन सुरू करण्यात येणार आहे. परदेशात शिक्षण घेतले तरी भारतामध्ये परत येऊन देशाची सेवा करायची आहे, हे ध्यानात ठेवा, असे प्रतिपादन क्षत्रिय मराठा मंडळ, रत्नागिरीचे अध्यक्ष सुरेशराव सुर्वे यांनी केले.
क्षत्रिय मराठा मंडळातर्फे शनिवारी सायंकाळी माळनाका येथील देसाई बॅंक्वेट हॉल येथे गौरव गुणवंतांचा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी दहावी, बारावीतील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मंचावर प्रमुख पाहुण्या म्हणून बिहार सरकारच्या राज्य प्रकल्प व्यवस्थापन युनिटमधील विकास अभ्यासक पायल घोसाळकर, प्रचार प्रमुख संतोष तावडे, उपाध्यक्ष प्राची शिंदे, खजिनदार जितेंद्र विचारे आणि विजय पाटील उपस्थित होते.
प्रास्ताविकामध्ये मंडळाचे प्रचारप्रमुख संतोष तावडे यांनी सांगितले की, गौरव गुणवंतांचा अशाच एका कार्यक्रमातून पायल घोसाळकर यांचा सत्कार मंडळाने केला होता व त्यांनी त्यावेळी भाषणही केले होते. अशा प्रकारे आपल्या मुलांना व्यासपीठ द्यायचे आहे, तो हेतू यशस्वी होत आहे. २००८ ला मंडळाच्या स्थापनेपासून हा कार्यक्रम आयोजित करत आहोत. अलीकडेच अखिल मराठा महासंमेलन यशस्वी केले. मंडळाच्या अनेक कार्यकर्त्यांनी त्यावेळी अहोरात्र मेहनत घेतली. मंडळाचे ८०० हून अधिक आजीव सदस्य आहेत. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे मारुती मंदिर येथे श्री शिवाजी महाराजांच्या मूर्तीची नित्य पूजा केली जाते. तेथे दर महिन्याच्या एक तारखेला क्षत्रिय मराठा मंडळातर्फे पूजा केली जाते. वृक्षारोपण, मराठा बिझनेसमन फोरमतर्फे दरमहा बैठक, मंडळाचा वर्धापनदिन असे विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करतो. त्यामध्ये मराठा समाजातील बंधू-भगिनींनी आवर्जून सहभाग घ्यावा.
प्रमुख पाहुण्या पायल घोसाळकर म्हणाल्या की, आपणाला आवडणाऱ्या क्षेत्रात जेव्हा आपण १००० तासांचा कठोर सराव करतो, तेव्हा त्यात पारंगत होतो. स्वतःला ओळखा, त्यानुसार क्षेत्र निवडा आणि निवडलेल्या क्षेत्रात उत्तम आणि प्रतिभावंत असं कार्य करून दाखवा. आपण एखाद्या क्षेत्रात पडल्याशिवाय विश्वास ठेवू नका. मी अडीच वर्षे बिहारमध्ये काम करत आहे. मराठा तरुण उद्योजकांना संधी उपलब्ध करून देणाऱ्या मराठा बिझनेसमन फोरम म्हणजे मराठा समाजासाठी अभिमानाची गोष्ट आहे. गौरव गुणवंताचा कार्यक्रमात बोलून गेलेले की माझं सिव्हिल सर्विसेसमध्ये जाण्याचं स्वप्न होतं. त्यासाठी पुण्यात गेले आणि मला कळलं की यूपीएससीच्या पुढे पण एक जग आहे. आयएएस अधिकाऱ्यांना सुद्धा समजावून सांगणारे कोणी तज्ज्ञ असू शकतात आणि मला बिहार सरकारने ही संधी दिली. आपणही विद्यार्थ्यांनी अशा संधी शोधा. त्यासाठी लागणारी मदत मी नक्की करेन.
यानंतर इयत्ता दहावीच्या परीक्षला ८५ टक्के अथवा अधिक गुण आणि इयत्ता बारावीच्या परीक्षेमध्ये ८० टक्के अथवा अधिक गुण (गुणपत्रिकेवरील टक्केवारीप्रमाणे) मिळालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कुणाल जाधव, चिन्मयी पाटील, योगेंद्र तावडे, यश खानविलकर, शार्दूल साळवी आणि आर्या देसाई यांनी प्रातिनिधिक मनोगतामध्ये क्षत्रिय मराठा मंडळाचे आभार मानून हा घरचा सत्कार असल्याने खूप आनंद झाल्याचे सांगितले. सूत्रसंचालन प्रथम सावंत, वैभवी पवार आणि श्रेया पाटील यांनी केले. सदस्य अमित कदम यांनी आभार मानले.