(जाकादेवी / संतोष पवार)
रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी-खालगाव येथील प्रसिद्ध मूर्तिकार सुनिल सुरेश जोशी यांच्या गणेशमूर्ती कारखान्यात यंदा तब्बल ५५० गणेशमूर्ती रंगरंगोटी पूर्ण होऊन गणरायाच्या आगमनासाठी सज्ज झाल्या आहेत. सध्या मूर्तींना अंतिम रंगाचा हात देण्याचे काम सुरू असल्याची माहिती मूर्तिकार सुनिल जोशी यांनी दिली.
जोशी कुटुंबीय गेल्या ५४ वर्षांहून अधिक काळ गणेशमूर्ती निर्मितीची कला जपत आहेत. सुनिल जोशी यांचे वडील सुरेश जोशी यांनी आपल्या कलेची सुरुवात कोतवडे येथील गणपती कारखान्यात काम करताना केली. तेथे त्यांनी मूर्ती घडविण्याचे कौशल्य आत्मसात केले. त्यानंतर काही वर्षांनी जाकादेवी-खालगाव येथे स्थायिक झाल्यानंतर त्यांनी स्वतःच्या हिमतीवर गणेशमूर्ती कारखाना उभारला. या प्रवासात त्यांच्या पत्नीचेही मोलाचे पाठबळ लाभले.
एक फुटापासून सहा फुटांपर्यंतच्या गणेशमूर्ती साकारण्याचे कौशल्य जोशी कुटुंबीयांनी आत्मसात केले आहे. विविध आसनांतील आकर्षक आणि प्रमाणबद्ध गणेशमूर्ती त्यांच्या कुंचल्यातून साकारल्या जातात. त्यांच्या हातून घडलेल्या मूर्ती भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेतात.
विशेष म्हणजे, साच्याचा वापर न करता मोठ्या आकाराच्या गणेशमूर्ती साकारण्यात सुरेश जोशी आणि त्यांचे पुत्र सुनिल जोशी यांचा हातखंडा आहे. त्यांच्या या कलाकौशल्यामुळे रत्नागिरी तालुक्यासह संगमेश्वर आणि गुहागर परिसरातून त्यांच्या गणेशमूर्तींना मोठी मागणी असते.
जोशी यांच्या कारखान्याला प्राथमिक शाळा, माध्यमिक विद्यालये तसेच कनिष्ठ महाविद्यालयांचे विद्यार्थी क्षेत्रभेटीच्या निमित्ताने भेट देतात. यावेळी जोशी कुटुंबीय प्रत्येक व्यक्तीचे तसेच समूहाचे मनापासून स्वागत करून गणेशमूर्ती निर्मितीची प्रक्रिया समजावून सांगतात.
ज्येष्ठ मूर्तिकार सुरेश जोशी यांच्याकडून मिळालेली ही कला आता पुढील पिढीही जपण्याचे काम करत आहे. त्यांचे सुपुत्र सुनिल जोशी, नात प्रांजली, नातू अर्णव तसेच सुवर्णा जोशी आणि सानिका जोशी हेही गणेशमूर्ती कलेत सक्रियपणे सहभागी आहेत. मूर्ती निर्मितीच्या कामात कुटुंबातील सर्व सदस्य मनापासून योगदान देतात. त्याचबरोबर परिसरातील होतकरू कलाकारही आवडीने या कारखान्यात सहभागी होऊन गणेशमूर्ती घडविणे आणि रंगकामात मदत करतात.
गणेशमूर्तींसाठी आवश्यक असलेली माती पनवेल येथून आणली जाते. शाडू मातीचा वापर करून विविध स्वरूपांत साकारलेल्या गणेशमूर्ती विद्यार्थी आणि भाविकांचे सहज लक्ष वेधून घेतात. वडिलोपार्जित ही मूर्तीकला सुनिल जोशी यांनी आवडीने जपली असून भविष्यातही ही परंपरा पुढे नेण्याचा त्यांचा मानस आहे.
गणेशमूर्ती साकारताना मिळणारा भक्तीभाव आणि सेवाभावी कार्यातून मिळणारे अर्थार्जन समाधान देणारे असल्याचे सुनिल जोशी सांगतात. ‘गणरायाच्या आशीर्वादाने सुख दारी येते,’ अशी भावना व्यक्त करताना या गणेशमूर्ती निर्मितीच्या हंगामात परिसरातील तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देता येत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.


