(रत्नागिरी / वार्ताहर)
रत्नागिरी जिल्ह्याला मराठी भाषा आणि साहित्य क्षेत्रात नवे स्थान मिळवून देणारे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी सोमवारी जाहीर केले. रत्नागिरीत २५ कोटी रुपये खर्चून अत्याधुनिक मराठी भाषा संग्रहालय उभारले जाणार असून, साने गुरुजींच्या पालगड येथे ‘पुस्तकांचे गाव’ साकारले जाणार आहे. तसेच पुण्यानंतर राज्यातील दुसरा मोठा पुस्तक महोत्सव रत्नागिरीत भरविण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.
जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित मराठी भाषा विभागाच्या आढावा बैठकीत आणि साहित्यिकांसोबतच्या संवाद कार्यक्रमात डॉ. सामंत बोलत होते. यावेळी महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीकृष्ण जोशी, मराठी भाषा समिती सदस्य प्रकाश देशपांडे, गजानन पाटील, प्रा. शिवराज गोपाळे, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, प्रांताधिकारी जीवन देसाई तसेच विश्वकोश निर्मिती मंडळ व राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. शामकांत देवरे यांच्यासह अनेक साहित्यिक उपस्थित होते.
बैठकीत जिल्ह्यातील साहित्यिकांनी मांडलेल्या विविध सूचना आणि अपेक्षांचे डॉ. सामंत यांनी स्वागत केले. मराठी भाषा विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देतानाच त्यांनी महत्त्वपूर्ण निर्णयांची घोषणाही केली.
रत्नागिरीत एक एकर जागेवर २५ कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या मराठी भाषा संग्रहालयात बोलीभाषा संशोधन केंद्र, पुस्तक विक्री केंद्र आणि शब्दकोश निर्मिती दालन उभारण्यात येणार आहे. तसेच साने गुरुजींच्या पालगड येथे ‘पुस्तकांचे गाव’ हा अभिनव उपक्रम राबविला जाणार असून, रत्नागिरीत दरवर्षी भव्य पुस्तक महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे.
याशिवाय राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र मराठी भाषा विभाग कार्यालय सुरू करून मराठी भाषा अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मुंबईतील नरिमन पॉईंट येथे १०० कोटी रुपये खर्चून मराठी भाषा भवन, तर ऐरोली येथे ४० कोटी रुपये खर्चून मराठी भाषा संशोधन केंद्र उभारण्यात येणार आहे. महिला साहित्य संमेलन आणि युवा साहित्य संमेलनासाठी प्रत्येकी ५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठीचा विस्तार
मराठी भाषेच्या संवर्धनासाठी राज्य शासनाने विविध स्तरांवर महत्त्वपूर्ण पावले उचलल्याचे सांगताना डॉ. सामंत म्हणाले, बेळगाव सीमाभागातील २०० ग्रंथालयांना २ कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. तंजावर येथील ऐतिहासिक सरस्वती ग्रंथालयाला ३५ वर्षांनंतर आर्थिक मदत देण्याचा मान महाराष्ट्राला मिळाला असून, तेथे मराठी भाषा विभागासाठी जागाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
दिल्लीतील जेएनयूमध्ये कवी कुसुमाग्रज यांच्या नावाने अध्यासन केंद्रासाठी १० कोटी रुपये देण्यात आले असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्यावर एम.ए. अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. विद्यापीठ परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळाही उभारला जाणार आहे.
नागपूर, चंद्रपूर, अमरावती, नाशिक, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर येथे मराठी भाषा विकास केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. लंडनमधील ऐतिहासिक महाराष्ट्र मंडळाची वास्तू शासनाने विकत घेतली असून, तेथे आंतरराष्ट्रीय मराठी भाषा वैश्विक केंद्र उभारण्यात येणार आहे. दुबई एक्स्पो आणि जपानमध्ये मराठी संस्कृतीचे यशस्वी सादरीकरण झाल्याचा उल्लेख करत पुढील विश्व मराठी संमेलन परदेशात आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.
जगातील पहिले धावत्या रेल्वेमधील ग्रामीण साहित्य संमेलन आयोजित केल्याचा उल्लेख करत मराठी भाषेला जागतिक स्तरावर अधिक सक्षम करण्याचा शासनाचा निर्धार असल्याचे डॉ. सामंत यांनी स्पष्ट केले.

