(रत्नागिरी /प्रतिनिधी)
गेल्या वर्षभरापासून खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याने उपचार सुरू असलेल्या ६० वर्षीय महिलेचा रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय (सिव्हिल) रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील कार्यवाही सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रमिला प्रकाश गोठणकर (वय ६०, रा. मावळंगे, बोल्येवाडी, ता. जि. रत्नागिरी) या गेल्या सुमारे एका वर्षापासून खोकला व श्वास लागण्याच्या आजाराने त्रस्त होत्या. २५ जून रोजी सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास त्या घरातील बाथरूममधून बाहेर आल्यानंतर अचानक खाली बसल्या. त्यांना श्वास घेण्यास अधिक त्रास होऊ लागल्याचे लक्षात येताच मुलगा रत्नदीप प्रकाश गोठणकर यांनी त्यांना तातडीने उपचारासाठी रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय (सिव्हिल) रुग्णालयात दाखल केले.
जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (आयसीयू) त्यांच्यावर उपचार सुरू असताना २६ जून रोजी पहाटे १.०८ वाजता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक २४/२०२६ अन्वये करण्यात आली असून, मृत्यूचे नेमके कारण वैद्यकीय तपासणीनंतर स्पष्ट होणार आहे. याबाबत पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

