(रत्नागिरी / दापोली)
चौकशीच्या कामाला तीन-तीन वर्षे लागतात, असा ढिम्म कारभार खपवून घेतला जाणार नाही. चुकीची कामे करणाऱ्या अधिकाऱ्यांवर थेट कारवाई केली जाईल, असा कडक इशारा गृह (शहरे), महसूल, ग्रामविकास व पंचायत राज, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तसेच अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिला.
पंचायत समिती दापोलीची आमसभा राज्यमंत्री योगेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. तब्बल सहा तास चाललेल्या या मॅरेथॉन आमसभेत नागरिकांनी मांडलेल्या विविध प्रश्नांवरून राज्यमंत्री कदम यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारत कामकाजाबाबत स्पष्ट निर्देश दिले.
या आमसभेला जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे, पंचायत समिती सभापती उन्मेष राजे, उपसभापती नम्रता तोडणकर, नगराध्यक्ष कृपा घाग, प्रांताधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, तहसीलदार अर्चना बोंबे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह जाधव, विभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई यांच्यासह पंचायत समिती सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रस्त्यांच्या कामांवर सार्वजनिक बांधकाम विभागाला तंबी
रस्त्यांवरील खड्डे निकषानुसारच भरले गेले पाहिजेत, असे स्पष्ट करत राज्यमंत्री कदम यांनी मागील वर्षी करण्यात आलेल्या सर्व खड्डे भरणीच्या कामांची क्वालिटी कंट्रोलमार्फत चौकशी करण्याचे निर्देश दिले. या कामांचा अहवाल अधिकाऱ्यांनी चार दिवसांत सादर करावा, असेही त्यांनी सांगितले.
महावितरणकडून रस्ते आणि सिमेंट गटारे फोडून कामे केली जात असल्याच्या मुद्द्यावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. महावितरणने फोडलेले रस्ते दुरुस्त करून द्यावेत किंवा त्यासाठी आवश्यक निधी संबंधित विभागाकडे वर्ग करावा, असे निर्देश देत दोन्ही विभागांनी समन्वयाने काम करण्याची सूचना त्यांनी केली. जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे यांनीही जिल्ह्यात अशा प्रकारे खोदण्यात आलेल्या रस्त्यांचा आढावा घेण्यास सांगितले.
स्मार्ट मीटर, वीजबिल आणि पीएम सूर्यघर योजनेवर निर्देश
शासनाच्या निर्णयानुसार स्मार्ट मीटर परस्पर लावले जाणार नाहीत, असे राज्यमंत्री कदम यांनी स्पष्ट केले. तसेच ‘पीएम सूर्यघर योजने’चा लाभ दापोलीतील प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यासाठी अधिकाऱ्यांनी थेट गावात जाऊन मंजुरी देण्याचे निर्देश त्यांनी दिले.
एका ग्राहकाला २१ हजार रुपयांचे चुकीचे वीज बिल पाठविण्यात आल्याच्या तक्रारीची चौकशी करण्याचे आदेशही त्यांनी दिले. ग्राहकांची फसवणूक केल्याचे आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला. दापोलीतील पर्यटन आणि औद्योगिक भागातील वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी महावितरणला दिल्या.
एसटीच्या फेऱ्या बंद न करण्याचे निर्देश
शाळांना सुट्टी असली तरी गावातील एसटी फेरी बंद करू नये, ती गावकऱ्यांसाठी सुरू ठेवावी, असे निर्देश राज्यमंत्री कदम यांनी एसटी प्रशासनाला दिले. एसटीच्या चुकीमुळे झालेल्या अपघातात नुकसान झालेल्या बाधिताला वर्ष उलटूनही भरपाई मिळाली नसल्याचा मुद्दा आमसभेत उपस्थित करण्यात आला. संबंधित बाधिताला आजच्या आज नुकसानभरपाई देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
भूसंपादनासाठी आवश्यक असलेल्या ४६ कोटी रुपयांच्या निधीसाठी मंत्रालयीन पातळीवर पाठपुरावा सुरू असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
विविध विभागांच्या प्रश्नांवर अधिकाऱ्यांना जाब
आमसभेत आंबा-काजू हमीभाव, जलजीवन मिशन, महसूल, वनविभाग, आरोग्य, भूमी अभिलेख आणि पोलीस यंत्रणेशी संबंधित विविध प्रश्न उपस्थित करण्यात आले. नागरिकांनी मांडलेल्या समस्या आणि मागण्यांबाबत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांकडून राज्यमंत्री कदम यांनी माहिती घेतली.
आमसभेत उपस्थित करण्यात आलेल्या सर्व समस्या आणि मागण्यांवर संबंधित खात्यांनी येत्या सात दिवसांत सविस्तर अहवाल सादर करावा, असे आदेश राज्यमंत्री योगेश कदम यांनी बैठकीच्या शेवटी दिले.


