(चाफे / हरेश गावडे)
रत्नागिरीतील चाफे येथील मयेकर महाविद्यालयात शुक्रवार दिनांक २८ नोव्हेंबर रोजी मराठी विभाग, आणि सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील मराठी लोककलांच्या संवर्धनाच्या दृष्टीने, महाराष्ट्रातील विविध लोककलांचा जागर उत्साहात संपन्न झाला.
राज्यामध्ये ज्या कलेने गावाचं सौंदर्य, संस्कृती जतन केली ती आपली लोककला तिचं अस्तित्व कुठेतरी लोप होताना पाहायला मिळत आहे. ही लोककला माणसात रुजावी, शिक्षणा lबरोबरच आपली संस्कृती आणि लोककला यांचे संवर्धन व्हावे या दृष्टीने नाटक, लावणी, पोवाडा, गोंधळ इत्यादी लोककलांचे सादरीकरण करण्यात आले. तसेच स्वामी समर्थ थिएटर्स रत्नागिरी यांच्या संपूर्ण टीमने सादरीकरण केलेला लोक कलेची जागृतीचा हा कार्यक्रम प्रबोधनात्मक संदेश देणारा ठरला.
संपूर्ण महाराष्ट्रभर जाखडी, नमन भारुड, लावणी, गोंधळ इत्यादींची रंगबाजी विविध रूपात पाहायला जरी मिळत असली तरी तिचे अस्तित्व कमी होत आहे. लावणी व तमाशा सारखे महाराष्ट्रातील विविध कार्यक्रम यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे, म्हणूनच ही कला नव्याने रंग घ्यावी हा उद्देश ठेवून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
महाविद्यालयाच्या प्राचार्या स्नेहा पालये यांनी आपल्या मनोगतातून महाविद्यालयाच्या दृष्टीने होणाऱ्या विविध विद्यापीठ स्तरावरील स्पर्धा, व उपक्रम या बाबत विद्यार्थ्यांना या मार्गदर्शनाचा कसा फायदा होईल, विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या विविध कलागुणांना वाव मिळण्यासाठी आजचे हे मार्गदर्शन अतिशय उपयुक्त आहे. तसेच आपल्या या लोककला महाराष्ट्र राज्य पुरत्याच मर्यादित न राहता साता समुद्र पार पोहोचल्या पाहिजे, या दृष्टीने लोककलांचा प्रसार झाला पाहिजे, असे मत मांडून आलेल्या संपूर्ण टीमचे आणि या कार्यक्रमाचे सूत्रधार ऋषीराज धुंदुर यांना पुढील कार्यक्रमासाठी शुभेच्छाही दिल्या.
आजच्या या कार्यक्रमासाठी संस्थेचे कार्याध्यक्ष रोहित मयेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन संस्थेचे संचालक व खजिनदार सुरेंद्र माचिवले व महाविद्यालयाच्या प्राचार्या स्नेहा पालये यांच्या मार्फत होत असते. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक प्रणाल ओर्पे यांनी केले.

