(संगमेश्वर / वार्ताहर)
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात मोठ्या संख्येने चाकरमानी, गणेशभक्त आणि प्रवासी आपल्या गावी येत असतात. या काळात प्रवाशांची होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता, गाडी क्रमांक ०११५३/०११५४ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–रत्नागिरी गणपती विशेष एक्सप्रेसला कडवई रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात यावा, अशी मागणी निसर्गरम्य चिपळूण आणि संगमेश्वर रेल्वे फेसबुक ग्रुपचे प्रमुख संदेश जिमन यांनी कोकण रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.
कडवई तसेच परिसरातील अनेक गावांतील नागरिक, गणेशभक्त आणि प्रवाशांसाठी या विशेष गाडीचा थांबा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. सध्या या भागातील प्रवाशांना या गाडीचा लाभ घेण्यासाठी इतर रेल्वे स्थानकांवर जावे लागते. त्यामुळे अतिरिक्त प्रवास, वाहनभाड्याचा आर्थिक भार आणि वेळेचा अपव्यय सहन करावा लागतो. ही गैरसोय दूर करण्यासाठी कडवई रेल्वे स्थानकावर किमान दोन मिनिटांचा प्रायोगिक थांबा देण्याची मागणी करण्यात आली आहे.
यापूर्वी, सन २०२३ मध्ये ही गाडी दिवा–रत्नागिरी विशेष म्हणून धावत असताना कडवई येथे थांबा मिळावा यासाठी स्थानिक नेते जितेंद्र चव्हाण यांनी आंदोलन केले होते. त्यानंतर या गाडीला कडवई येथे थांबा मंजूर करण्यात आला होता. मात्र, गाडीचे स्वरूप बदलून ती आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–रत्नागिरी गणपती विशेष गाडी म्हणून चालविली जात असून, सध्या तिला कामथे रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. त्याच धर्तीवर कडवई रेल्वे स्थानकाचाही समावेश करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
गणेशोत्सवाच्या काळातील वाढती प्रवासी संख्या, कडवई परिसरातील नागरिकांची दीर्घकालीन मागणी आणि त्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन गाडी क्रमांक ०११५३/०११५४ ला कडवई रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करून तातडीने आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी निसर्गरम्य चिपळूण आणि संगमेश्वर रेल्वे फेसबुक ग्रुपच्या वतीने कोकण रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

