(संगमेश्वर / एजाज पटेल)
लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या लायन्स क्लब संगमेश्वर शाखेचा सन २०२६-२७ या वर्षाचा पदग्रहण सोहळा संगमेश्वरजवळील धामणी येथील ‘द ड्राईव्ह इन’ येथे उत्साहात पार पडला. यावेळी रविकांत शिंदे यांची सलग दुसऱ्यांदा आणि एकूण तिसऱ्यांदा अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीचे उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.
सन २००२ पासून लायन्स क्लब संगमेश्वरचे सक्रिय सदस्य असलेले रविकांत शिंदे यांनी गेल्या अनेक वर्षांत विविध सामाजिक उपक्रमांत मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त करत क्लबने त्यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा सोपवली. नूतन कार्यकारिणीत सचिवपदी अमोल पाटणे तर खजिनदारपदी मनीष चोचे यांची निवड झाली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महेश उपळकर यांनी प्रास्ताविकातून क्लबच्या वाटचालीचा आढावा घेतला. श्रीमती नेहा संसारे यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सामाजिक व कौटुंबिक परिचय करून दिला. पदग्रहण अधिकारी तथा लायन्स क्लबचे माजी विभागीय अध्यक्ष आशिष मेहता यांच्या हस्ते नूतन कार्यकारिणीला पद व गोपनीयतेची शपथ देण्यात आली. त्यांनी लायन्स क्लब संगमेश्वरच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत नव्या नेतृत्वाखाली सेवाभावी उपक्रमांना अधिक गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
लायन्स क्लब संगमेश्वरचे संस्थापक अध्यक्ष व माजी प्रांतपाल एम.जे.एफ. लायन उदय लोध यांनीही नूतन कार्यकारिणीचे अभिनंदन करत संस्थेच्या समाजाभिमुख कार्याची प्रशंसा केली.
पदभार स्वीकारल्यानंतर अध्यक्ष रविकांत शिंदे यांनी आगामी वर्षात ग्रामीण व दुर्गम भागातील गरजू रुग्णांसाठी आरोग्य सेवा, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रम, पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण तसेच विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यावर भर दिला जाईल, असे सांगितले.
यावेळी आयोजित करण्यात आलेल्या ‘वस्त्रदान’ उपक्रमाला सभासद, हितचिंतक आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उपस्थितांनी नवीन तसेच सुस्थितीतील कपडे, ब्लँकेट, चादरी, साड्या, शर्ट, पॅन्ट, ड्रेस आदी वस्त्रांचे उदारपणे दान केले. संकलित वस्त्रे माहेर अनाथ व वृद्धाश्रम तसेच दुर्गम भागातील गरजू व्यक्तींना वितरित करण्यात येणार आहेत.
या उपक्रमात पिंट्याभाई सावंत, यशवंत सैतावडेकर, शंकरशेठ भिंगार्डे, विवेक शेरे, डॉ. अमोल भिंगार्डे, पंकज कोकाटे, महेश उपळकर, श्रीमती नेहा संसारे, जमुरत अलजी, मनीष चोचे, योगेश भिंगार्डे आणि अतुल भिंगार्डे यांचे विशेष योगदान लाभले.
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी भविष्यात वस्त्रदानासोबतच आरोग्य, शिक्षण, पर्यावरण संवर्धन आणि महिला सक्षमीकरणासाठी सातत्याने उपक्रम राबविण्याची ग्वाही दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियोजन यशस्वीरीत्या पार पडले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. शेवटी योगेश भिंगार्डे यांनी उपस्थितांचे आभार मानले. लायन्स क्लब संगमेश्वरच्या या समाजाभिमुख उपक्रमाचे परिसरातून स्वागत होत असून, नव्या कार्यकारिणीकडून आगामी काळातही सेवाभावी उपक्रमांची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

