(संगमेश्वर / एजाज पटेल)
करजुवे ते चाफे खाडीत परवाना नसलेल्या यांत्रिक होडीने बेकायदेशीर आणि अवैध मासेमारी केली जात आहे. ही मासेमारी बाहेरील लोकांकडून केली जात असल्याने मासेमारी करून उदरनिर्वाह करणाऱ्या स्थानिक पारंपरिक मासेमारी लोकांना मासे मिळेनासे झाल्याने त्यांच्या समोर उदरनिर्वाहाचे मोठे संकट उभे ठाकले आहे. या अवैधरित्या व बेकायदेशीर सुरू असलेल्या मासेमारी करणाऱ्यांना सबंधित मत्स्य विभाग वेळीच आवर घालणार का?याकडे स्थानिक पारंपरिक मासेमारी लोकांचे लक्ष लागले आहे.
या खाडी लगत असलेल्या गावांमधील बहुतांशी लोक हे रात्रीच्या वेळी जाळी तसेच वावळीने मासेमारी करून कटुंबाचा उदरनिर्वाह करतात. परंतु येथील खाडीत परतालुका आणि जिल्हा बाहेरील लोकांनी संबंधित मत्स्यविभागाचा कोणताही परवाना नसताना बस्तान मांडले असून त्यांच्याकडून रात्रीच्या वेळी यांत्रिक होड्यांनी मासे पकडण्यास धुडघुस सुरू असतो. ह्या लोकांना या खाडीचा अंदाज नसल्याने व आपल्या मर्जीनुसार मासेमारी करण्यासाठी केल्या जाणाऱ्या धुडघुसपणामुळे स्थानिक मासेमारी करणाऱ्या लोकांनी मासे पकडण्यासाठी सोडलेल्या जाळी त्यांच्या यांत्रिक होडीला बसवण्यात आलेल्या पंख्यात गुंडाळुन नुकसान होत असल्याची संतप्त चर्चाही सुरू आहे. तर रात्रभर खाडीत राहून मासेही मिळेनासे झाल्याने मासेमारीवर अवलंबून कुटूंबाचे उदरनिर्वाह करणाऱ्यांवर एक प्रकारे संकटच ओढवले असल्याची संतप्त ओरड पारंपरिक स्थानिक मच्छिमारांकडून चर्चेद्वारे केली जात आहे.
संबंधित विभाग या खाडीच्या ठिकाणी फिरकत नसल्याने “ना कोणाचे भय ना कोणाचा डर” असा प्रकार सुरू आहे. मासेमारीसाठी लागणारा परवाना तसेच मासेमारीसाठी वापरण्यात येणाऱ्या यांत्रिक होडीसाठी लागणार परवाना(वी.आर.सी) नसणाऱ्या होड्या या खाडीतील काही ठिकाणी बाहेरील लोकांनी आणून ठेवल्या आहेत. रात्रभर ते मासेमारीसाठी धुडघुसच घालत आहेत. याची त्वरित दखल या भागात न फिरकणाऱ्या संबंधित मत्स्यविभागाने घ्यावी अशी मांगणी स्थानिक मच्छिमारांकडून केली जात असतानाच संबंधित विभाग आता कोणती कारवाई करणार याकडे त्यांचे लक्ष लागले आहे.

