(संगमेश्वर / एजाज पटेल)
मुंबई-गोवा महामार्गाच्या कामात ठेकेदाराच्या मनमानी आणि नियोजनशून्य कारभारामुळे संगमेश्वर येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरळीत व्हावे म्हणून कोणतेही नियोजन न करता सुरू करण्यात आलेल्या या कामामुळे प्रवासी जनता तासन्तास कोंडीत अडकून पडली.
संगमेश्वर एस. टी. स्टँडजवळ, देवरुखकडे जाणाऱ्या मुख्य महामार्गालगत भूमिगत सिमेंट पाइप टाकण्याचे काम सुरू आहे. या भागात याआधीही असेच निकृष्ट आणि नियोजनशून्य काम करण्यात आले होते. निसर्गाच्या पहिल्याच झटक्यात या कामाचा फज्जा उडाल्याने ठेकेदाराला पुन्हा दुरुस्तीचे काम करावे लागत आहे. मात्र, हे करताना वाहतुकीचे मार्ग आखणे, पर्यायी रस्ता उपलब्ध करून देणे किंवा पादचाऱ्यांसाठी सुरक्षितता राखणे अशा कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत.
शनिवारी आठवडा बाजाराचा दिवस असल्याने शहरात नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात होती. याचा विचारही न करता दिवसभर काम सुरू ठेवल्याने वाहनचालक आणि पादचारी यांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला. संतप्त नागरिकांनी कामाच्या ठिकाणी जाऊन संबंधितांना जाब विचारला आणि काम तातडीने थांबवण्यास भाग पाडले. काही नागरिकांनी थेट पोलीस ठाण्यात जाऊन ठेकेदाराच्या मनमानी कारभाराविरोधात तक्रारही दाखल केली.
नागरिकांच्या मते, “मुंबई-गोवा महामार्गाचा मालक जणू ठेकेदारच झाला आहे. वाट्टेल तिथे खड्डे खोदावेत, वाटेल तसा रस्ता बंद करावा आणि जनतेला वेठीस धरावं, असा हा ढिसाळ कारभार सहन केला जाणार नाही.”
प्रवाश्यांच्या सुरक्षिततेची आणि सोयीसुविधांची कोणतीही काळजी न घेता ठेकेदार कंपनीने केवळ मनमानी कारभार करत आहे, असा आरोप नागरिकांनी केला..”जर ठेकेदार जनतेला अशा प्रकारे वेठीस धरणार असेल, तर जनताही शांत बसणार नाही. जशास तसे उत्तर दिल्याशिवाय आम्ही थांबणार नाही,” असा इशाराही यावेळी संतप्त जनतेने दिला आहे.