(देवरुख / प्रतिनिधी )
देवरुख शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेला तितक्याच जुन्या आणि प्रसिद्ध अशा महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड या संस्थेकडून ‘उत्कृष्ट संस्था’ पुरस्कार प्रतीथयश पत्रकार डॉ उदय निरगुडकर यांचे हस्ते ७ डिसेंबर रोजी मुलुंड येथे प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप एक लाख आणि सन्मानाचिन्ह असे आहे.
डॉ. उदय निरगुडकर यांनी देवरुख सारख्या छोट्या गावातील संस्थेने केलेल्या कार्याची प्रशंसा करून संस्था करत असलेले कार्य हे देश विकासासाठी असलेले कार्य आहे व हा पुरस्कार एका सतशील संस्थेने दुसऱ्या एका सतपात्री संस्थेला दिलेला पुरस्कार आहे असे आपल्या मनोगतात नमूद केले.
याप्रसंगी देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदानंद भागवत यांची मकरंद जोशी यांनी प्रकट मुलाखत घेतली. सदानंद भागवत यांनी हा पुरस्कार संस्थापक श्री काकासाहेब पंडित यांचेपासून त्यानंतर आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचा असून हा शंभर वर्षाच्या अविरत परिश्रमाला आणि तळमळीला मिळालेला पुरस्कार आहे असे सांगून हा पुरस्कार सर्व पूर्वसुरींना समर्पित केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड या संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर वझे होते. सूत्रसंचालन सौ वृंदा दाभोळकर यांनी केले. कार्यक्रमाला दे. शि. प्र. मंडळाचे कार्यवाह शिरीष फाटक, कार्यवाह अशोक चाळके, उपाध्यक्ष कृष्णकुमार भोसले, सृजन विज्ञान केंद्राचे संचालक चंद्रशेखर केदारी तसेच अनेक मुलुंड व देवरुखवासीय उपस्थित होते.

