(रत्नागिरी / वार्ताहर)
प्रेम म्हणजे केवळ आनंदाचे क्षण नव्हेत, तर संकटाच्या काळातही एकमेकांचा हात न सोडता आयुष्यभर साथ देण्याची भावना होय. या प्रेमाची हृदयस्पर्शी प्रचिती रत्नागिरी तालुक्यातील पावसजवळील बेहेरेवाडी येथील शुभम रमाकांत चव्हाण आणि त्यांच्या जीवनसाथी गिरिजा (पूर्वाश्रमीच्या प्रज्योती) चव्हाण यांच्या आयुष्यातून दिसून येते.
सन २०१८ मध्ये झालेल्या भीषण दुचाकी अपघातात शुभम यांच्या मानेच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली. स्पायनल कॉर्ड इन्ज्युरीमुळे मानेखालचा संपूर्ण भाग निकामी झाला आणि ते क्वाड्राप्लेजिक झाले. स्वतःचा सलून व्यवसाय सांभाळणाऱ्या आणि अनेक स्वप्ने पाहणाऱ्या तरुणाचे आयुष्य एका क्षणात बदलून गेले.
दैनंदिन प्रत्येक कामासाठी त्यांना इतरांवर अवलंबून राहावे लागले.
अपघातानंतर त्यांच्यावर कोल्हापूर येथील सूर्या हॉस्पिटल, त्यानंतर विन्स हॉस्पिटलमध्ये डॉ. संतोष प्रभू तसेच रत्नागिरीतील डॉ. फडके यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार झाले. मात्र अपेक्षित सुधारणा होत नव्हती. अंघोळ घालणे, कपडे बदलणे, जेवण भरविणे यासह सर्व कामांसाठी त्यांना आई रश्मी चव्हाण यांच्यावर अवलंबून राहावे लागत होते.
घरी असताना फिजिओथेरपिस्ट डॉ. नितीन चौके नियमित उपचार करत होते. मात्र कोरोनाच्या काळात उपचारांमध्ये खंड पडल्याने शुभम मानसिकदृष्ट्याही खचले. अशा कठीण काळात मित्रांनी त्यांना खंबीर साथ दिली. फिजिओथेरपिस्ट साक्षी साखळकर यांनी सातत्याने उपचार करून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केला. अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करण्याची प्रेरणा त्यांनी दिली आणि पुढील उपचारांसाठी मुंबईतील हाजी अली येथील पुनर्वसन केंद्रात जाण्याचा सल्ला दिला.
यानंतर शुभम यांनी मुंबईतील हाजी अली येथे तीन महिने तसेच पीएमटी, लोणी येथे तीन टप्प्यांत फिजिओथेरपी घेतली. त्यानंतर अडीच वर्षे घरी नियमित व्यायाम आणि उपचार सुरू ठेवले. पुढे मुंबईतील शरण संस्थेत दोन वर्षे राहून त्यांनी सातत्याने फिजिओथेरपी, पुनर्वसन आणि विविध कौशल्यांचे प्रशिक्षण घेतले. याच काळात त्यांना पॅरा स्पोर्ट्समध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली आणि राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारता आली.
या अथक प्रयत्नांचे फळ मिळू लागले. सुरुवातीला आधाराने उभे राहणे, त्यानंतर काठीच्या सहाय्याने चालणे, जिने चढणे-उतरणे आणि स्वतःची अनेक दैनंदिन कामे स्वतः करणे त्यांना शक्य झाले.
दरम्यान, पुनर्वसन शिबिरात मिळालेली व्हीलचेअर त्यांच्या गरजेनुसार उपयुक्त नसल्याने स्वावलंबी जीवनात अडचणी येत होत्या. यूडीआयडी कार्डसाठी जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरी येथे गेल्यानंतर त्यांची आरएचपी फाउंडेशनचे अध्यक्ष सादिक नाकाडे यांच्याशी भेट झाली. शुभम यांची परिस्थिती लक्षात घेऊन त्यांनी पुढाकार घेत निओमोशनच्या इलेक्ट्रिक व्हीलचेअरसाठी त्यांची नोंदणी केली.
निओमोशनची इलेक्ट्रिक व्हीलचेअर मिळाल्यानंतर शुभम यांच्या आयुष्यात मोठा सकारात्मक बदल झाला. आता ते कोणाच्याही मदतीशिवाय बाहेर जाऊ शकतात, स्वतःची अनेक कामे करू शकतात आणि आत्मविश्वासाने जीवन जगत आहेत. या सुविधेमुळे त्यांना घरून डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात वर्क फ्रॉम होम करून स्वावलंबी आयुष्य जगणेही शक्य झाले आहे.
या संघर्षमय प्रवासात त्यांच्या प्रेमाचीही कठोर परीक्षा झाली. अपघातापूर्वी शुभम आणि प्रज्योती चव्हाण एकमेकांवर प्रेम करत होते. अपघातानंतर आयुष्यात आलेल्या कठीण प्रसंगांमध्येही प्रज्योती यांनी त्यांची साथ सोडली नाही. समाजाची टीका, भविष्याबाबतची अनिश्चितता आणि अनेक अडचणींचा सामना करत त्यांनी नात्यातील विश्वास कायम जपला.
अखेर तब्बल आठ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ९ जुलै २०२६ रोजी शुभम आणि प्रज्योती विवाहबंधनात अडकले. विवाहानंतर प्रज्योती यांचे नाव गिरिजा शुभम चव्हाण असे झाले. त्या सध्या मुंबईतील महेंद्र कोटक बँकेत कार्यरत असून शुभम घरून डिजिटल मार्केटिंगचे काम करतात. सध्या हे दाम्पत्य विरार येथे आनंदी आणि समाधानाचे वैवाहिक जीवन जगत आहे.
शुभम यांचे वडील स्वर्गीय रमाकांत चव्हाण हे रत्नागिरी मनोरुग्णालयात अटेंडंट म्हणून कार्यरत होते. आई रश्मी चव्हाण यांनी मुलाच्या पुनर्वसनासाठी घेतलेले अथक परिश्रम या यशामागील मोठी ताकद ठरली. मोठी बहीण तेजस्विनी विवाहित असून धाकटी बहीण साईश्वरी एमएसएफ दलात कार्यरत आहे.
एका भीषण अपघाताने शुभम यांचे आयुष्य बदलले, मात्र जिद्द, कुटुंबाची साथ, वैद्यकीय उपचार, पुनर्वसन आणि प्रेमाच्या बळावर त्यांनी नव्याने आयुष्य उभे केले. त्यांची कहाणी ही केवळ एका विवाहाची नाही, तर संकटावर मात करणाऱ्या इच्छाशक्तीची, निस्सीम प्रेमाची आणि आत्मविश्वासाच्या विजयाची प्रेरणादायी गाथा आहे.
अपंगत्व ही शरीराची मर्यादा असू शकते, मनाची नाही. जिद्द, सकारात्मक विचार आणि सततचा प्रयत्न असेल, तर कोणतीही व्यक्ती प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आयुष्यात नवी उंची गाठू शकते, याचा प्रेरणादायी संदेश शुभम आणि गिरिजा यांच्या प्रवासातून मिळतो.

