(अलिबाग / रायगड)
रायगड जिल्ह्यातील अलिबाग पोलिसांनी वन्यजीव तस्करीविरोधात मोठी कारवाई करत सुमारे 4 कोटी रुपये किमतीचे 4 किलो अँबरग्रीस (Ambergris) जप्त केले आहे. या प्रकरणी राहुल पंढरीनाथ हातणी या संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याकडून वापरण्यात आलेली दुचाकीही जप्त करण्यात आली आहे. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सव्वाचार कोटी रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, अलिबाग पोलिसांचे विशेष पथक चाळमाळा परिसरात गस्त घालत असताना चाळमाळा जेटीजवळ एक संशयास्पद दुचाकीस्वार आढळला. पोलिसांनी त्याला थांबवून दुचाकीची तपासणी केली असता, डिकीत ठेवलेल्या कापडी पिशवीमध्ये सुमारे 4 किलो वजनाचे अँबरग्रीस आढळून आले. आंतरराष्ट्रीय बाजारात या अँबरग्रीसची किंमत सुमारे 4 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.
या कारवाईत पोलिसांनी अँबरग्रीससह संशयिताची दुचाकी जप्त केली असून, आरोपीला पुढील चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. प्राथमिक तपासात आरोपीविरुद्ध यापूर्वी कोणताही गुन्हा नोंद नसल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास अलिबाग पोलीस करत आहेत.
अँबरग्रीस म्हणजे काय?
अँबरग्रीस हा स्पर्म व्हेलच्या पचनसंस्थेत तयार होणारा अत्यंत दुर्मिळ मेणासारखा पदार्थ आहे. सामान्य भाषेत त्याला ‘व्हेल माशाची उलटी’ असे म्हटले जाते, जरी तो नेहमीच उलटीच्या स्वरूपात तयार होत नाही. स्पर्म व्हेल मासा समुद्रात स्क्विड (Squid) खातो. मासा हा चोचीसारखा कठीण भाग पचवू शकत नाही, जो नंतर त्याच्या आतड्यातून मेणासारख्या द्रव्यासोबत बाहेर टाकला जातो. समुद्राच्या खाऱ्या पाण्यावर आणि सूर्यप्रकाशात राहून हा पदार्थ कठीण आणि सुगंधी होतो. याला तरंगणारे सोने (Floating Gold) म्हटले जाते. आंतरराष्ट्रीय स्तरावर महागड्या परफ्यूम उद्योगात सुगंध टिकवून ठेवण्यासाठी (Fixative) तसेच काही औषधी संशोधनांमध्ये त्याला मोठी मागणी आहे.
भारतात वन्यजीव संरक्षण कायदा, 1972 अंतर्गत अँबरग्रीसची बेकायदेशीर विक्री, खरेदी, साठवणूक किंवा तस्करी हा गंभीर आणि अजामीनपात्र गुन्हा मानला जातो. त्यामुळे या प्रकरणाला वन्यजीव गुन्ह्यांच्या दृष्टीने विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

