(रत्नागिरी / प्रतिनिधी)
जिल्ह्यातील कर्ला गावची सुकन्या सुरभी दीपक अभ्यंकर यांनी अमेरिकेतील इंडियाना युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिन, इंडियानापोलिस येथून ‘बायोकेमिस्ट्री अॅण्ड मॉलेक्युलर बायोलॉजी’ या विषयात पीएच.डी. पदवी संपादन करून रत्नागिरी जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. या उल्लेखनीय यशामुळे त्या या क्षेत्रात डॉक्टरेट मिळवणाऱ्या जिल्ह्यातील एकमेव विद्यार्थिनी ठरल्या आहेत.
१५ मे २०२५ रोजी इंडियानापोलिस येथे झालेल्या मुख्य दीक्षांत समारंभात फक्त पीएच.डी. प्राप्त विद्यार्थ्यांची नावे व्यासपीठावर जाहीर करण्यात आली. यावेळी सुरभी यांना त्यांच्या संशोधन मार्गदर्शकांच्या हस्ते ‘डॉक्टोरल हूडिंग’ करण्यात आले. विद्येच्या सर्वोच्च शिखराचं प्रतीक असलेल्या राजेशाही निळ्या रंगाच्या शालेला (हूड) त्यांनी गौरवाने स्वीकारलं. समारंभात युनिव्हर्सिटीच्या अध्यक्ष डॉ. पामेला व्हिटन यांनी त्यांना डॉक्टरेट पदवी अधिकृतरीत्या प्रदान केली.
यानंतर १६ मे रोजी इंडियाना युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनच्या स्वतंत्र दीक्षांत समारंभात, डीन यांच्या हस्ते सुरभी यांना पुन्हा एकदा डॉक्टोरल हूडिंग आणि पीएच.डी. प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं. विशेष म्हणजे, या समारंभाच्या अधिकृत स्मरणिकेत त्यांच्या शैक्षणिक यशाची स्वतंत्र नोंद घेण्यात आली होती. त्यांना Sigma Xi Grants-in-Aid of Research, Elite 50 Graduate Recognition, आणि Peter J. Roach Graduate Fellowship या तीन प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्कारांसाठी गौरवण्यात आलं असून, ही अत्यंत दुर्मीळ मान्यता मानली जाते.
सुरभी यांची ही यशोगाथा जिद्द, सातत्य, कुटुंबाचा पाठिंबा आणि विज्ञानावरील निष्ठा यांचं प्रेरणादायी उदाहरण ठरते. त्यांच्या या प्रवासातून रत्नागिरी जिल्ह्यातील नव्या पिढीला नक्कीच दिशा आणि प्रेरणा मिळेल.