(रत्नागिरी)
दोन हस्तीदंत जवळ बाळगल्याप्रकरणी मंडणगड येथील तरुणासह रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील एकाला मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईत एक स्कूटर, दोन मोबाइलसह १० लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमालही पोलिसांनी जप्त केला आहे.
आकाश प्रकाश पवार (२८, रा. माणगाव, रायगड), नितीन विलास धामणे (२६, रा. मंडणगड) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. ही कारवाई रविवारी सायंकाळी डोंबिवलीतील एमआयडीसी परिसरात करण्यात आली. याठिकाणी दोन तरुण हस्तीदंत घेऊन येणार असल्याची माहिती मानपाडा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून या दोघांना ताब्यात घेतले.
ही कामगिरी पूर्व प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त संजय जाधव, परिमंडळ ३ कल्याणचे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे, डोंबिवली विभाग सहायक पोलिस आयुक्त सुहास हेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कादबाने, पोलिस निरीक्षक (गुन्हे) राम चोपडे, पोलिस निरीक्षक (प्रशासन) दत्तात्रय गुंड, पोलिस निरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) जयपाल गिरासे, सहायक पोलिस निरीक्षक महेश राळेभात, संपत फडोळ, पोलिस हवालदार राजेंद्रकुमार खिलारे, सचिन साळवी, सुनील पवार, शिरीष पाटील, संजू मासाळ, विकास माळी, पोलिस नाईक गणेश भोईर, कृष्णा बोराडे, यल्लापा पाटील, शिपाई घनःश्याम ठाकूर, अशोक आहेर, गणेश बडे, सोपान शेळके यांच्या पथकाने केली.
मानपाडा येथे कारवाई
या कारवाईत मानपाडा पोलिसांनी ३९ सेंटीमीटर व ८ सेंटीमीटरचे दोन हस्तीदत ताब्यात घेतले आहेत. त्यातील एकाची गोलाई २२ सेंमी, तर दुसऱ्याची २१ सेंमी आहे. पोलिसांनी वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२चे कलम ९,३९,४४,४९ (क) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.