(देवळे / प्रकाश चाळके)
कोकण हे लोककलेचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. येथील विविध पारंपरिक कलांमधून कोकणची संस्कृती, इतिहास आणि सामाजिक परंपरा जिवंत राहिल्या आहेत. नमन, जाखडी (शक्ती तुरा), भारूड, गोंधळ, भजन आणि कीर्तन यांसारख्या लोककलांना शासनाकडून प्रोत्साहन मिळत असताना, गणेशोत्सवात मोठ्या उत्साहाने सादर होणाऱ्या महिलांच्या पारंपरिक टिपरी नृत्यालाही शासनाचा राजाश्रय व कलाकारांना मानधन मिळावे, अशी मागणी महिला कलाकारांनी केली आहे.
अलीकडेच नमन आणि जाखडी या लोककलांना शासनाकडून मान्यता व आर्थिक पाठबळ मिळाले आहे. त्याच धर्तीवर कोकणातील पारंपरिक टिपरी नृत्याचाही लोककला प्रकारात समावेश करून या कलेचे संवर्धन करण्याची गरज व्यक्त होत आहे. आजही ही कला ग्रामीण भागात मोठ्या उत्साहाने जपली जात असली, तरी शासनाच्या पातळीवर तिच्याकडे अपेक्षित लक्ष दिले गेलेले नाही, अशी खंत महिला कलाकारांनी व्यक्त केली.
श्रावण महिन्यात नागपंचमीपासूनच गावागावांत महिलांच्या आणि मुलींच्या टिपरी नृत्याच्या सरावाला सुरुवात होते. वाड्यावस्त्यांवर रात्री एकत्र येऊन पारंपरिक गीते, नवीन चाली, गोफ नृत्य, समई नृत्य तसेच समाजप्रबोधनपर गीतांचा सराव केला जातो. गणेशोत्सवात ही मंडळे आकर्षक वेशभूषेत विविध ठिकाणी टिपरी नृत्य सादर करून प्रेक्षकांची मने जिंकतात.
टिपरी नृत्यातील ताल, लय, समन्वय आणि पारंपरिक शैली जपण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागते. अनेकदा पौराणिक कथा, सामाजिक विषय आणि लोकजीवनावर आधारित गीते चित्रपटांच्या चालीवर सादर केली जातात. यामुळे ही कला मनोरंजनाबरोबरच समाजप्रबोधनाचेही प्रभावी माध्यम ठरते.
महिलांच्या या लोककलेला अद्याप शासनाकडून कोणतेही विशेष प्रोत्साहन किंवा मानधन मिळत नसल्याने अनेक कलाकार निराश आहेत. ग्रामीण भागात ही कला अजूनही टिकून असली, तरी योग्य पाठबळ मिळाले नाही तर भविष्यात तिचे अस्तित्व धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
नमन आणि जाखडीप्रमाणेच टिपरी नृत्यालाही शासनाचा राजाश्रय, मानधन आणि विविध सांस्कृतिक योजनांमध्ये स्थान मिळाल्यास या पारंपरिक कलेचे जतन आणि संवर्धन होण्यास मोठी मदत होईल. तसेच लोकप्रतिनिधींनीही हा विषय शासन दरबारी मांडून महिला कलाकारांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी महिला शाहीर आणि टिपरी नृत्य कलाकारांनी केली आहे.

