(रत्नागिरी / वार्ताहर)
महेश मिलके स्विमिंग ग्रुपचा ८ वा वर्धापन दिन रविवारी (२६ जुलै) उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे ग्रुपच्या अधिकृत संकेतस्थळाचे (वेबसाईट) लोकार्पण आणि ग्रुपच्या आठ वर्षांच्या यशस्वी प्रवासाचे दस्ताऐवजीकरण करणाऱ्या पहिल्या पुस्तकाचे दिमाखदार प्रकाशन होय.
या कार्यक्रमात महेश मिलके स्विमिंग ग्रुपच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य, विभागीय आणि जिल्हास्तरावर उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत जलतरणपटूंचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच गेल्या आठ वर्षांपासून प्रशिक्षक महेश मिलके यांच्या कार्यावर विश्वास ठेवून प्रत्येक टप्प्यावर भक्कम साथ देणाऱ्या पालकांचाही सन्मान करण्यात आला. या सोहळ्यास ३०० हून अधिक क्रीडाप्रेमी, पालक आणि मान्यवर उपस्थित होते.
विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाला प्रशासकीय, राजकीय, सामाजिक, वैद्यकीय, विधी आणि क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. शिंदे, रत्नागिरीच्या नगराध्यक्षा सौ. शिल्पा सुर्वे, भाजप महिला मोर्चाच्या मंत्री सौ. शिल्पा मराठे, जिल्हा परिषद सदस्य ॲड. मांडवकर, ज्येष्ठ विधितज्ज्ञ ॲड. भाई गवाणकर, कौमुदी कन्स्ट्रक्शनचे संतोषजी तावडे, क्षत्रिय मराठा मंडळाच्या उपाध्यक्षा सौ. प्राचीताई सुर्वे, निवृत्त पोलीस कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष तथा निवृत्त पीएसआय ओंकार चाळके, राष्ट्रीय जलतरणपटू मारुती चरापले, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. शुभांगी बेडेकर, हृदयविकारतज्ज्ञ डॉ. प्रणाम केंद्रे आणि नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. सूर्यवंशी यांचा समावेश होता.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी प्रशिक्षक महेश मिलके यांच्या समर्पित कार्याची, शिस्तबद्ध प्रशिक्षण पद्धतीची आणि रत्नागिरीत दर्जेदार जलतरणपटू घडविण्याच्या त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची मुक्तकंठाने प्रशंसा केली.
पालकांच्या योगदानाचा विशेष गौरव
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात ग्रुपमधील पालकांनीही मोलाची भूमिका बजावली. शिवसेना शहरप्रमुख बिपीन बंदरकर, विक्रांत देसाई, विनय देसाई (विवेक हॉटेल), गिरीधर तावडे, अजय काळे, शरद भिडे, चंदन जाधव, अल्फाराज कापडे, स्वप्नील खटावकर, सत्यवान बिरवाडकर, अजित पिलणकर, कौस्तुभ सावंत आणि चंदन खानविलकर यांच्यासह अनेक पालकांनी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.
क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय प्रगतीबरोबरच अधिकृत संकेतस्थळाच्या माध्यमातून डिजिटल विश्वात टाकलेले पाऊल आणि पुस्तकरूपाने जपलेला ग्रुपचा प्रेरणादायी प्रवास ही भविष्यातील वाटचालीसाठी महत्त्वाची ठरेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

