उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा पाठिंबा, राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे
(रत्नागिरी/ प्रतिनिधी )
तालुक्यातील हातखंबा–पाली जिल्हा परिषद गटात गेल्या काही दिवसांपासून महायुतीचा उमेदवार निश्चित न झाल्याने राजकीय अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले होते. पारंपरिक चेहऱ्यांऐवजी नव्या आणि कर्तव्यनिष्ठ उमेदवाराला संधी द्यावी, अशी चर्चा जोर धरत असतानाच वंचित बहुजन आघाडीचे नाव प्रकर्षाने पुढे येत होते. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यातून स्वतःची ओळख निर्माण केलेले मुकुंद सावंत हे संभाव्य उमेदवार म्हणून सातत्याने चर्चेत होते.
या चर्चांना आज अधिकृत स्वरूप मिळाले. वंचित बहुजन आघाडीचे मुकुंद सावंत यांनी हातखंबा–पाली जिल्हा परिषद गटातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी रॅली काढत शक्तिप्रदर्शन करण्यात आले. या रॅलीत वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सत्ता किंवा पद नसतानाही प्रामाणिक सामाजिक कार्यातून सावंत यांनी आपला ठसा उमटवला असून, शिव–शाहू–फुले–आंबेडकर विचारधारेचा प्रभाव त्यांच्या कार्यात दिसून येतो. जनतेकडून मिळत असलेला पाठिंबा आणि आशीर्वाद आजही आपल्या पाठीशी असल्याचा विश्वास व्यक्त करत सावंत यांनी नव्या जोमाने निवडणूक रिंगणात पुनरागमन केले आहे.
हातखंबा–पाली जिल्हा परिषद गटातील लढतीला नवे वळण मिळाले असून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मुकुंद सावंत यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा पाठिंबा जाहीर झाला आहे. या पाठिंब्यामुळे या गटातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसू लागली आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंब्यामुळे ही लढत केवळ पक्षीय न राहता विचारांची आणि नेतृत्वाची थेट टक्कर ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. शिव–शाहू–फुले–आंबेडकर विचारधारेवर ठाम असलेल्या सावंत यांच्या उमेदवारीला उद्धवसेनेची साथ मिळाल्याने विरोधी गटांवरील दबाव वाढला आहे.
दरम्यान, वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या या भूमिकेमुळे उद्धवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड जोश आणि उत्साह संचारला आहे. “सामान्य माणसाच्या पाठीशी उभे राहण्याची हीच खरी शिवसेना” अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत असून, प्रचाराला नवसंजीवनी मिळाल्याचे चित्र आहे. सत्ता नसतानाही सामाजिक कार्यातून आपला ठसा उमटवलेल्या मुकुंद सावंत यांना मिळालेला हा पाठिंबा हातखंबा–पाली गटातील लढत अधिक आक्रमक, तीव्र आणि लक्षवेधी बनवणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. आता आगामी काळात प्रचाराची धार अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

