(रत्नागिरी / प्रतिनिधी)
आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तातडीची मदत उपलब्ध करून देणाऱ्या ‘डायल ११२’ सेवा प्रणालीमध्ये रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने उल्लेखनीय कामगिरी नोंदवत राज्यभरात विशेष ठसा उमटवला आहे. भांडणे, अपघात, महिलांच्या तक्रारी, वैद्यकीय आपत्कालीन प्रसंग तसेच कायदा व सुव्यवस्थेशी संबंधित घटनांवर पोलीस पथके आता अवघ्या काही मिनिटांत घटनास्थळी दाखल होत असून, या तत्परतेमुळे अनेक गंभीर प्रसंगांमध्ये जीवितहानी टाळणे आणि तणावपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणणे शक्य झाले आहे.
जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षाच्या आकडेवारीनुसार, जानेवारी ते डिसेंबर २०२५ या कालावधीत रत्नागिरी पोलिसांना एकूण ७ हजार ४०० आपत्कालीन कॉल्स प्राप्त झाले होते. त्या काळात घटनास्थळी पोहोचण्याचा पोलिसांचा सरासरी प्रतिसाद वेळ ८ मिनिटे ४५ सेकंद इतका होता. या कामगिरीच्या आधारे रत्नागिरी जिल्हा राज्यात ३२ व्या क्रमांकावर होता. मात्र, ही सेवा अधिक प्रभावी आणि वेगवान करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी विशेष लक्ष केंद्रित केले. दररोजच्या कामकाजाचा बारकाईने आढावा घेत, तांत्रिक अडचणी दूर करण्याबरोबरच पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. या नियोजनबद्ध प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम अल्पावधीतच दिसून आले.
जानेवारी २०२६ ते मे २०२६ या अवघ्या पाच महिन्यांच्या कालावधीत पोलिसांना ९२१ कॉल्स प्राप्त झाले. यावेळी पोलिसांनी कमालीची तत्परता दाखवत आपला सरासरी प्रतिसाद वेळ थेट ६ मिनिटे ३४ सेकंदांवर आणला. या लक्षणीय सुधारणेमुळे रत्नागिरी जिल्ह्याने तब्बल २५ स्थानांची झेप घेत महाराष्ट्रात ३२ व्या क्रमांकावरून थेट ७ वा क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे, राज्यातील पहिल्या दहा जिल्ह्यांमध्ये मानाचे स्थान मिळवत रत्नागिरी पोलिसांनी कार्यक्षमतेचा नवा आदर्श निर्माण केला आहे.
पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमधील समन्वय, सततची देखरेख आणि जलद प्रतिसाद यामुळेच हे यश शक्य झाल्याचे पोलीस विभागाकडून सांगण्यात आले. भविष्यातही ‘डायल ११२’ सेवा अधिक सक्षम आणि प्रभावी ठेवण्यासाठी पोलीस दल कटिबद्ध असल्याचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी स्पष्ट केले. तसेच कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी न घाबरता आणि पूर्ण विश्वासाने ‘डायल ११२’ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

