( चिपळूण / वार्ताहर )
चक्कर आल्याने तोल जाऊन पिंपळी ब्रीजवरून खाली पडल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या इरफान आदम चिखलकर (वय ३५, रा. पिंपळी बुद्रुक, चांदणी मोहल्ला, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गुरुवार, २२ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.२८ वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास इरफान चिखलकर यांना चक्कर आली. त्यावेळी ते पिंपळी ब्रीजवर येथे गेले असता त्यांचा तोल गेला आणि ते पुलावरून खाली पडले. या घटनेत ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांचे भाऊ इमरान आदम चिखलकर यांनी खासगी रुग्णवाहिकेच्या मदतीने त्यांना कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
कामथे येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर इरफान यांना पुढील उपचारांसाठी डेरवण येथील रुग्णालयात हलविण्यात आले. तेथील उपचारानंतर १६ ऑक्टोबर रोजी त्यांना अधिक उपचारांसाठी रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना गुरुवारी, २२ ऑक्टोबर रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे चिपळूण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


