(रत्नागिरी)
जिल्ह्यातील माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा, वीर नारी, वीर माता आणि वीर पिता यांच्या विविध समस्या व अडीअडचणी जागेवरच सोडवण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने विशेष पुढाकार घेतला आहे. त्यानुसार जुलै २०२६ मध्ये खेड, चिपळूण आणि मंडणगड तालुक्यांमध्ये कल्याण संघटकांचे विशेष दौरे आयोजित करण्यात आले असून, या माध्यमातून विविध प्रशासकीय व पेन्शनसंदर्भातील समस्यांचे निवारण करण्यात येणार आहे.
जुलै महिन्यातील दौऱ्यांचे वेळापत्रक
६ जुलै (सोमवार) : सैनिकी मुलांचे वसतिगृह, खेड येथे कल्याण संघटक राहुल काटे उपस्थित राहतील.
७ जुलै (मंगळवार) : सैनिकी मुलांचे वसतिगृह, चिपळूण येथे राहुल काटे यांचा दौरा.
१३ जुलै (सोमवार) : सैनिकी मुलांचे वसतिगृह, खेड येथे सुनील कदम (अ. शा. कल्याण संघटक) उपस्थित राहतील.
१४ जुलै (मंगळवार) : सैनिकी मुलांचे वसतिगृह, चिपळूण येथे सुनील कदम यांचा दौरा.
१५ जुलै (बुधवार) : मंडणगड येथे सुनील कदम उपस्थित राहतील.
२० जुलै (सोमवार) : सैनिकी मुलांचे वसतिगृह, खेड येथे अनिल मोरबाळे उपस्थित राहतील.
२१ जुलै (मंगळवार) : सैनिकी मुलांचे वसतिगृह, चिपळूण येथे अनिल मोरबाळे यांचा दौरा.
२७ जुलै (सोमवार) : सैनिकी मुलांचे वसतिगृह, खेड येथे राहुल काटे उपस्थित राहतील.
२८ जुलै (मंगळवार) : सैनिकी मुलांचे वसतिगृह, चिपळूण येथे राहुल काटे यांचा दौरा.
कोणत्या समस्यांचे होणार निवारण?
या विशेष शिबिरांमध्ये माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या रेकॉर्ड ऑफिसशी संबंधित प्रकरणे, पेन्शन विषयक अडचणी, महासैनिक पोर्टलवरील नवीन नोंदणी, तसेच इतर प्रशासकीय समस्यांचे जागेवरच निराकरण करण्यात येणार आहे.
मेळाव्यात येताना ही कागदपत्रे सोबत आणा
या सेवेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी खालील कागदपत्रांच्या मूळ व छायांकित प्रती सोबत आणाव्यात.
- महासैनिक पोर्टल नोंदणीची पावती
- डिस्चार्ज बुक
- पीपीओ (PPO) ची प्रत
- पॅन कार्ड
- बँक पासबुक
- ईसीएचएस (ECHS) कार्ड
- आधार कार्ड आणि आधारशी लिंक असलेला कार्यरत मोबाईल क्रमांक
जिल्ह्यातील सर्व पात्र माजी सैनिक, त्यांच्या विधवा तसेच वीर नारी, वीर माता आणि वीर पिता यांनी आपल्या जवळच्या केंद्रावर निश्चित तारखेला उपस्थित राहून या विशेष सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने केले आहे.

