(रत्नागिरी /प्रतिनिधी)
मिऱ्या-नागपूर महामार्गावर चारचाकी वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेला बैल रस्त्यावर रक्तबंबाळ अवस्थेत तडफडत पडला होता. अपघातानंतर वाहनचालकाने घटनास्थळावरून पोबारा केला; मात्र मुक्या जीवाला असहाय अवस्थेत सोडून जाण्याऐवजी रत्नागिरीकरांनी माणुसकीचा हात पुढे केला. प्रशासनाकडे मदतीसाठी संपर्क करूनही अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप मदतकर्त्यांनी केला. अखेर ‘व्यवस्था’ येण्याची वाट न पाहता नागरिकांनीच पुढाकार घेत जखमी बैलाला गोशाळेत दाखल केले.
मिऱ्या-नागपूर महामार्गावरील जेके फाइल्सजवळ बुधवारी (२ सप्टेंबर) रात्री पावणेआठच्या सुमारास हा अपघात झाला. चारचाकी वाहनाने बैलाला जोरदार धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असतानाच वाहनचालक वाहनासह पसार झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, नाचणे ग्रामपंचायतीचे कर्मचारी तसेच मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तरुणांनी पुढाकार घेत जखमी बैलावर प्राथमिक उपचार सुरू केले. दरम्यान, महामार्गावरील वाहतूक सुरळीत राहावी आणि आणखी दुर्घटना घडू नये, यासाठी नागरिकांनीच बैलाभोवती बॅरिकेड्स उभारले. मदतकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, या मार्गावरून काही पोलीस कर्मचारी पुढे गेले. त्यापैकी एका कर्मचाऱ्याने घटनास्थळी थांबून ११२ क्रमांकावर मदतीसाठी संपर्क साधला. मात्र ११२ ची गाडी तब्बल एक ते दीड तासानंतर घटनास्थळी पोहोचल्याचा दावा मदतकर्त्यांनी केला आहे.
याहून गंभीर आरोप म्हणजे, घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांकडून जखमी बैलावर उपचार करण्यासाठी धावून आलेल्या मदतकर्त्यांवरच दबाव टाकण्याचा प्रयत्न झाल्याचे संबंधितांनी सांगितले. मुक्या प्राण्याच्या वेदना कमी करण्यासाठी धडपडणाऱ्या नागरिकांना मदत करण्याऐवजी त्यांनाच जाब विचारला जात असल्याचा आरोप झाल्याने प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दरम्यान, पाली येथील डॉक्टर राज सावंत हे याच मार्गावरून जात असताना जखमी बैलाची अवस्था पाहून स्वतःहून थांबले. त्यांनी तातडीने बैलाला प्रथमोपचार करत इंजेक्शन दिले. व्यावसायिक जबाबदारीपलीकडे जाऊन एका मुक्या जीवासाठी थांबलेल्या डॉक्टरांच्या या कृतीतून माणुसकीचे दर्शन घडले.
यानंतर युवा उद्योजक आनंद चौगुले घटनास्थळी पोहोचले. त्यांनी स्वतःचा जेसीबी आणून जखमी बैलाला टेम्पोमध्ये चढविण्याची व्यवस्था केली. त्यानंतर बैलाला चंपक मैदान येथील गोशाळेत उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे त्याला चारा देण्यात आला असून पुढील उपचार सुरू करण्यात आले. जखमी बैलाच्या उपचारासाठी मदत करणाऱ्या नागरिकांनी नगर परिषद अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, हा परिसर नाचणे ग्रामपंचायतीच्या हद्दीत येत असल्याचे सांगून जबाबदारी झटकण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर ग्रामपंचायत प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नसल्याचे मदतकर्त्यांनी सांगितले.
एका बाजूला महामार्गावर जखमी झालेला जीव मदतीच्या प्रतीक्षेत तडफडत होता; तर दुसऱ्या बाजूला ‘ही आमची हद्द नाही’ या प्रशासकीय सोयीस्कर भूमिकेच्या भोवऱ्यात मदतीचा प्रश्न अडकला, असा संताप नागरिकांकडून व्यक्त होत आहे. अखेर कोणत्याही प्रशासकीय यंत्रणेची वाट न पाहता नागरिकांनीच पुढाकार घेतला आणि जखमी बैलाला सुरक्षितपणे गोशाळेत पोहोचवले. मुक्या जीवासाठी नागरिकांनी माणुसकी दाखवली; मात्र या घटनेने प्रशासनाच्या संवेदनशीलतेची परीक्षा घेतली. अपघातग्रस्त अथवा जखमी प्राण्यांच्या मदतीसाठी तातडीची यंत्रणा नेमकी कुठे आहे, तिची जबाबदारी कोणाची आणि संकटाच्या क्षणी नागरिकांनीच पुढे यायचे असेल तर प्रशासनाची भूमिका नेमकी काय, असा सवाल या घटनेनंतर उपस्थित झाला आहे.

