(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (जीएमसी) शैक्षणिक वाटचालीत आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आहे. वैद्यकीय विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष रुग्णांवर उपचार करण्यापूर्वी अत्याधुनिक सिम्युलेशन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सुरक्षित आणि दर्जेदार प्रशिक्षण मिळावे, यासाठी महाविद्यालयात अत्याधुनिक ‘स्किल लॅब’ उभारण्यास महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिली आहे. वैद्यकीय शिक्षण व आयुष आयुक्तालयामार्फत यासंदर्भातील अधिकृत पुरवठा आदेश नुकताच जारी करण्यात आला असून, या प्रकल्पामुळे रत्नागिरीतील वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा राष्ट्रीय स्तरावर अधिक बळकट होणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व आयुष संचालनालयाने २२ जुलै २०२६ रोजी जारी केलेल्या आदेशानुसार, जालना येथील मेसर्स गस्टो फार्मा या संस्थेला ‘टर्न-की’ तत्त्वावर स्किल लॅब उभारण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी प्रत्येकी ₹९ कोटी ४९ लाख इतका निधी मंजूर करण्यात आला असून, रत्नागिरीसह नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातही अशाच स्वरूपाच्या स्किल लॅब उभारल्या जाणार आहेत. या तिन्ही प्रकल्पांसाठी शासनाने एकूण ₹२८ कोटी ४७ लाखांची तरतूद केली आहे.
या अत्याधुनिक स्किल लॅबमध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वैद्यकीय प्रक्रियेचा अनुभव देणारी जागतिक दर्जाची सिम्युलेशन उपकरणे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. प्रसूती व्यवस्थापनासाठी अॅडव्हान्स बर्थिंग सिम्युलेटर, नवजात बालकांच्या आपत्कालीन उपचारांसाठी नेओनेटल रेससिटेशन ट्रेनर, हृदयविकारावरील उपचारांचे प्रशिक्षण देणारा कार्डियाक मॅनेकिन, तसेच नेत्रतपासणीसाठी ऑप्थाल्मिक एक्झामिनेशन ट्रेनर यांसारख्या आधुनिक साधनांचा समावेश असणार आहे. याशिवाय आयव्ही आर्म, त्वचेवर टाके घालण्याचे प्रशिक्षण देणारी मॉडेल्स आणि विविध वैद्यकीय प्रक्रियांचा सराव करण्यासाठी तब्बल २७ प्रकारची अत्याधुनिक उपकरणे या प्रयोगशाळेत उपलब्ध असतील.
या सुविधेमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष रुग्णांवर उपचार करण्यापूर्वी विविध वैद्यकीय परिस्थितींचा सखोल सराव करता येणार आहे. सिम्युलेटरच्या साहाय्याने प्रशिक्षण घेतल्यामुळे विद्यार्थ्यांचे तांत्रिक कौशल्य, निर्णयक्षमता, आत्मविश्वास आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याची क्षमता अधिक सक्षम होणार आहे. परिणामी, रुग्णसेवेचा दर्जाही अधिक गुणवत्तापूर्ण होण्यास मदत मिळणार असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे. कंत्राटातील अटींनुसार, देशांतर्गत उपकरणांचा पुरवठा ३६ आठवड्यांत, तर परदेशातून आयात होणाऱ्या उपकरणांचा पुरवठा ४४ आठवड्यांत पूर्ण करणे बंधनकारक आहे. सर्व उपकरणांवर दोन वर्षांची वॉरंटी तसेच त्यानंतर आठ वर्षांची देखभाल व दुरुस्तीची हमी देण्यात येणार आहे.
कोकणातील वैद्यकीय शिक्षणाच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण मानला जात असून, अत्याधुनिक प्रशिक्षण सुविधा उपलब्ध झाल्यामुळे रत्नागिरी जीएमसीतील विद्यार्थ्यांना महानगरांतील वैद्यकीय संस्थांच्या तोडीस तोड प्रात्यक्षिक शिक्षण मिळणार आहे. त्यामुळे भविष्यात अधिक सक्षम, कुशल आणि रुग्णकेंद्री डॉक्टर घडविण्याच्या दिशेने रत्नागिरीने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकल्याचे मानले जात आहे.

