(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र गणपतीपुळे येथील मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या भाद्रपदी गणेशोत्सवाची सांगता आज (बुधवारी) वामन द्वादशीच्या पवित्र दिनी महाप्रसादाने करण्यात आली. या महाप्रसादाचा सुमारे २१०० भाविकांनी लाभ घेतला. यामध्ये स्थानिक ग्रामस्थांसह विविध ठिकाणांहून आलेल्या भाविक आणि पर्यटकांचा समावेश होता.
संस्थान श्री देव गणपतीपुळे यांच्यामार्फत प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही गणपती मंदिरात भाद्रपदी गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. उत्सवाच्या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रम भक्तिभावाने पार पडले. दररोज श्रींची महापूजा, आरती, मंत्रपुष्प तसेच सुश्राव्य कीर्तन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
गणेश चतुर्थीच्या पवित्र दिवशी मंदिराच्या प्रदक्षिणामार्गावरून श्रींची वाजतगाजत पालखी मिरवणूक काढण्यात आली. मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात झालेल्या या मिरवणुकीत भाविकांनी सहभाग घेतला.
विविध धार्मिक कार्यक्रमांनी भक्तिमय वातावरणात रंगलेल्या भाद्रपदी गणेशोत्सवाची सांगता बुधवारी वामन द्वादशीच्या दिवशी महाप्रसादाने करण्यात आली. महाप्रसादासाठी भाविकांची मोठी उपस्थिती होती. संपूर्ण भाद्रपदी गणेशोत्सव शांततेत आणि भक्तिभावाने पार पाडण्यासाठी देवस्थान समितीची पंच कमिटी, पुजारी, कर्मचारी तसेच स्थानिक ग्रामस्थांनी विशेष मेहनत घेतली.


