(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त करण्यात येणाऱ्या २०२ शिक्षण सेवकांच्या समुपदेशनाची (काउन्सिलिंग) प्रक्रिया पुढील आठवड्यात पार पडण्याची दाट शक्यता आहे. शिक्षक भरतीची ही प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली असून, नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांचे लक्ष शिक्षण विभागाच्या अधिकृत घोषणेकडे आणि समुपदेशनाच्या तारखेकडे लागले आहे.
दरम्यान, या मुख्य प्रक्रियेपूर्वी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने उर्दू माध्यमाच्या ८ शिक्षकांच्या समायोजनाचा (Adjustment) महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. हे समायोजन येत्या बुधवार, दिनांक २८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात पार पडणार आहे. विद्यार्थी संख्येच्या निकषानुसार अतिरिक्त आणि रिक्त जागांचा आढावा घेऊन ही यादी निश्चित करण्यात आली आहे. संबंधित ८ शिक्षकांनी आपले नियुक्ती आदेश, आधार कार्ड आणि आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांसह विहित वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी केले आहे. या प्रक्रियेनंतर जिल्ह्यातील रिक्त उर्दू शाळांना हक्काचे शिक्षक मिळणार आहेत.
जिल्ह्यात सध्या १,५०० हून अधिक डी.एड. आणि बी.एड. धारक बेरोजगार उमेदवार नोकरीच्या आशेवर आहेत. शिक्षक भरती प्रक्रियेत स्थानिक उमेदवारांना प्राधान्य मिळावे, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने केली जात आहे. मात्र, राज्यस्तरावरून ऑनलाइन पद्धतीने आणि शिक्षक पात्रता परीक्षा (TET) गुणांच्या आधारावर होणाऱ्या ‘पविञ पोर्टल’च्या पारदर्शक प्रक्रियेमुळे स्थानिक उमेदवारांचा टक्का कमालीचा घसरल्याचे चित्र आहे. आतापर्यंत झालेल्या भरतीत स्थानिक उमेदवारांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच असल्याने स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
१,०२७ रिक्त पदांपैकी केवळ ४५८ जागांवरच भरती
रत्नागिरी जिल्ह्यात शिक्षकांची एकूण १,०२७ पदे रिक्त आहेत. मात्र, या मोठ्या रिक्ततेच्या तुलनेत पवित्र पोर्टलद्वारे आतापर्यंत केवळ ४५८ पदांवरच प्रत्यक्षात भरती करण्यात आली आहे. या नियुक्त शिक्षण सेवकांना ग्रामीण भागातील शाळांमध्ये पदस्थापना देण्यात आली असून, त्यामुळे काही शाळांमधील शिक्षकांचा प्रश्न तात्पुरता मिटला आहे. उर्वरित रिक्त जागा लवकरात लवकर भराव्यात, अशी मागणी शिक्षण वर्तुळातून होत आहे. आता उर्दू माध्यमाच्या ८ शिक्षकांचे समायोजन यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर, पुढील आठवड्यात २०२ शिक्षण सेवकांच्या समायोजनाचा मार्ग मोकळा होणार आहे. जिल्हा परिषदेकडून अधिकृत तारीख जाहीर झाल्यानंतर या उमेदवारांना समुपदेशनाद्वारे ग्रामीण भागातील दुर्गम व गरजू शाळांमध्ये नियुक्तीचे आदेश दिले जातील, अशी माहिती शिक्षण विभागातील सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात होणाऱ्या या प्रक्रियेकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.


