(रत्नागिरी / प्रतिनिधी)
कासारी ते चाफेरीमार्गे खंडाळा येथे जात असताना दुचाकीवरील नियंत्रण सुटून वाहन सिमेंटच्या कठड्याला धडकले आणि दरीत कोसळले. या भीषण अपघातात दुचाकीचालक अनुप सत्यनारायण शर्मा (वय २०, रा. उत्तर प्रदेश) याचा मृत्यू झाला, तर दुचाकीवर मागे बसलेले दोघे जखमी झाले. ही दुर्घटना ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास कासारी गवाणवाडी येथील उताराच्या रस्त्यावर घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, अनुप शर्मा हा आपल्या ताब्यातील टीव्हीएस दुचाकीवरून (क्रमांक एमएच ०८ एआर ६९२०) ऋतिक शिवधनी पटेल (वय २३) आणि नीरज कश्यप (वय २१) यांना मागे बसवून कासारी येथून चाफेरीमार्गे खंडाळ्याच्या दिशेने जात होता. कासारी गवाणवाडी येथील उताराच्या रस्त्यावर आल्यानंतर रस्त्याची परिस्थिती लक्षात न घेता दुचाकी भरधाव आणि निष्काळजीपणे चालविल्याने वाहन रस्त्याच्या बाजूला असलेल्या सिमेंटच्या कठड्याला धडकले. त्यानंतर दुचाकीसह तिघेही दरीत कोसळल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या अपघातात अनुप शर्मा याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा मृत्यू झाला. दुचाकीवर मागे बसलेले ऋतिक पटेल आणि नीरज कश्यप हे दोघेही जखमी झाले. अपघातात दुचाकीचेही नुकसान झाले.
या प्रकरणी ऋतिक शिवधनी पटेल याने जयगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मृत दुचाकीचालक अनुप शर्मा याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायद्यातील कलम १८४ आणि १२८ अन्वये नोंद करण्यात आली आहे. या अपघाताचा पुढील तपास जयगड पोलीस करीत आहेत.


