(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
रत्नागिरी तालुक्यातील रंगभूमीवर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत कलाकारांचा गौरव करत त्यांच्या कलाप्रवासाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला ‘रंग उद्याचे’ हा सत्कार सोहळा उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात पार पडला. कै. रमेश भाटकर स्मृती उत्सवी नाट्य स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या कलाकारांचा या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला.
समाजातील नवोदित कलाकारांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्यांच्या कलेची दखल घेणे, कलाक्षेत्रात सातत्याने कार्य करण्यासाठी प्रेरणा देणे आणि भावी रंगभूमीसाठी सक्षम कलाकार घडविणे हा या उपक्रमामागील प्रमुख हेतू होता. सुशील जाधव यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाने कलावंतांच्या कार्याचा गौरव करत सांस्कृतिक चळवळीला नवे बळ दिले.
कार्यक्रमास ज्येष्ठ रंगकर्मी विजय मोहिते, अनंत सावंत, विजय कांबळे, श्री. पाडावे, सागर मायंगडे, रीलस्टार विलास कांबळे, अरुण जाधव, सुहास आयरे, ॲड. अमित जाधव, श्री. पवार, मनीष मोहिते तसेच प्रदीप पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष प्रतिष्ठा प्राप्त झाली. यावेळी अरुण जाधव, सौरभ जाधव, अनंत जाधव, संदेश सावंत, सागर मायंगडे, मनीष मोहिते, मुग्धा जाधव आणि गार्गी सावंत या गुणवंत कलाकारांचा गौरवचिन्ह, शाल आणि गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. कलाकारांच्या यशस्वी वाटचालीचा गौरव करत त्यांच्या भावी कलाप्रवासासाठी शुभेच्छाही देण्यात आल्या.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी रंगभूमी ही केवळ मनोरंजनाचे माध्यम नसून समाजप्रबोधनाचे प्रभावी व्यासपीठ असल्याचे अधोरेखित केले. नवोदित कलाकारांनी सातत्य, मेहनत आणि कलानिष्ठा जपत आपल्या अभिनयातून समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याची भूमिका पार पाडावी, असे आवाहनही करण्यात आले. कलाकारांच्या चेहऱ्यावरील आनंद, उपस्थित रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि सन्मान सोहळ्यातील आत्मीयता यामुळे ‘रंग उद्याचे’ हा उपक्रम खऱ्या अर्थाने उद्याच्या रंगभूमीला दिशा देणारा आणि गुणवंत कलावंतांचा आत्मविश्वास वृद्धिंगत करणारा ठरला.

