(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर तालुक्यातील प्राथमिक शिक्षण विभागात नियम व कायदे धाब्यावर बसवून करण्यात आलेल्या कामगिरी बदल्यांचा प्रकार अखेर चव्हाट्यावर आला आहे. पंचायत समितीच्या सभापती शर्वरी वेल्ये यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेत सखोल चौकशी केली. त्यानंतर तब्बल ३२ गुरुजींच्या नियमबाह्य कामगिरी बदल्या रद्द करण्याचे आदेश देण्यात आले. या आदेशानंतर अन्यायाने बदली झालेल्या सर्व गुरुजींनी आपापल्या मूळ नियुक्त शाळांमध्ये पुन्हा हजेरी लावली आहे.
३२ गुरुजी पुन्हा मूळ शाळांमध्ये रुजू झाल्याने या बदल्यांच्या प्रक्रियेबाबत तालुक्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. नियमबाह्य पद्धतीने करण्यात आलेल्या या बदल्यांमागे नेमका कोणाचा वरदहस्त होता आणि पडद्यामागून सूत्रे कोण हलवत होते, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. शिक्षण विभागातील या संपूर्ण प्रकरणामुळे संगमेश्वर पंचायत समितीत राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर मोठी खळबळ उडाली आहे.
सभापती शर्वरी वेल्ये यांच्या आदेशानंतर मूळ शाळेत परतलेल्या गुरुजींमध्ये दिलासा व्यक्त होत असून, विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांमध्येही समाधानाचे वातावरण आहे. दुसरीकडे, सोयीच्या आणि जवळच्या शाळेत कामगिरी बदली मिळावी यासाठी प्रयत्न केलेल्या गुरुजींची मात्र मोठी गैरसोय झाली आहे. मिळालेली सोयीची शाळा हातातून गेल्याने पुन्हा मूळ शाळेत जावे लागल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे.
या प्रकरणानंतर पंचायत समितीच्या आवारापासून तालुक्यातील विविध गावांतील नाके, एसटी स्थानके आणि चहाच्या टपऱ्यांपर्यंत बदल्यांच्या चर्चेला उधाण आले आहे. ‘३२ बदल्यांची फाईल पुढे सरकत असताना संबंधित अधिकारी आणि कर्मचारी काय करत होते?’, ‘सेवाज्येष्ठता आणि अंतराचे नियम पाळले गेले होते का?’ तसेच ‘या संपूर्ण प्रक्रियेमागे नेमका कोणाचा प्रभाव होता?’ असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.
दरम्यान, कोणतीही राजकीय कृपादृष्टी किंवा प्रशासकीय वरदहस्त नसलेल्या गुरुजींवर झालेला अन्याय दूर झाल्याने पालक आणि ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र, केवळ बदल्या रद्द करून हा विषय संपवू नये, अशी त्यांची भूमिका आहे. ऐन शैक्षणिक वर्षात बदल्यांच्या या प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम झाल्याचा आरोप करत, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी पालकांनी केली आहे.
या बदल्यांमागे पडद्यामागून सूत्रे हलविणारा ‘आका’ कोण, हा प्रश्न आता तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे. नियमबाह्य बदल्यांचा निर्णय नेमका कोणाच्या इशाऱ्यावर झाला, याचा शोध घेऊन संबंधित ‘आका’वर विभागीय चौकशीसह कडक प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी पालक आणि ग्रामस्थांकडून होत आहे.
शिक्षणासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रातील नियमांची पायमल्ली आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी संबंधित निर्णयांबाबत जबाबदारी निश्चित झाली पाहिजे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. ३२ बदल्या रद्द झाल्यानंतर आता या प्रकरणामागील ‘आका’पर्यंत प्रशासन पोहोचणार का, की राजकीय दबावामुळे प्रकरण थंड बस्त्यात जाणार, याकडे संगमेश्वर तालुक्यासह रत्नागिरी जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.


