(खेड/ रत्नागिरी)
कोकण रेल्वेमार्गावर विनातिकीट प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांना चाप लावत रेल्वे प्रशासनाने तिकीट तपासणी मोहिमेला वेग दिला आहे. महसुली तूट भरून काढण्याच्या दृष्टीने राबवण्यात आलेल्या या मोहिमेत डिसेंबर महिन्यात तब्बल ९९८ कारवाया करण्यात आल्या असून, ४३,८९६ विनातिकीट प्रवासी रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रवाशांकडून २ कोटी ४५ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी ते डिसेंबर २०२५ या कालावधीत एकूण ८,४८१ विशेष तपासणी मोहिमा राबवण्यात आल्या. या मोहिमांदरम्यान ३ लाख ६८ हजार ९०१ फुकटे प्रवासी कारवाईच्या कचाट्यात सापडले असून, त्यांच्याकडून २० कोटी २७ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
नियमित रेल्वेगाड्यांसह विशेष (स्पेशल) गाड्यांमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढल्याचे निदर्शनास आल्यानंतर, कोकण रेल्वेच्या विशेष भरारी पथकाने तपासणी मोहीम अधिक गतिमान केली आहे. प्रवाशांना सुरक्षित व दर्जेदार सेवा देण्याचा प्रयत्न होत असतानाही मोठ्या प्रमाणावर फुकट प्रवास सुरू असल्याने प्रशासनाने दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे.
या कारवाईत परप्रांतीय प्रवाशांची संख्या सर्वाधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोकण मार्गावरील विविध स्थानकांवर भरारी पथके अचानक दाखल होऊन तपासणी करत असल्याने फुकट्यांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली आहे. पथकाला चकवा देण्याचा प्रयत्न करणारे प्रवासीही कारवाईपासून सुटलेले नाहीत. विशेषतः मांडवी, मत्स्यगंधा, कोकणकन्या आणि तुतारी एक्स्प्रेस या गाड्यांमध्ये विनातिकीट प्रवाशांचे प्रमाण अधिक असल्याचे उघड झाले आहे. तसेच, विनातिकीट प्लॅटफॉर्मवर प्रवेश करणाऱ्यांवरही दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
तिकीट तपासणी मोहीम यापुढेही अधिक तीव्र केली जाणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. वैध तिकिटावरच प्रवास करावा, असे आवाहन कोकण रेल्वेने सातत्याने प्रवाशांना केले आहे. सुरक्षित, सुव्यवस्थित आणि आरामदायी प्रवासासाठी वैध तिकिट अनिवार्य असल्याचे कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील नारकर यांनी सांगितले.

