(रत्नागिरी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील बनवाडी, सैतवडे येथे गेली सुमारे ७५ वर्षे अखंड सुरू असलेली आषाढी एकादशीची परंपरा यंदाही शनिवार, दि. २५ जुलै २०२६ रोजी भक्तिमय वातावरणात आणि ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागाने पार पडली. दिवसभर विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांनी श्री विठ्ठल-रखुमाई मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
उत्सवाची सुरुवात पहाटे काकड आरतीने झाली. त्यानंतर पारंपरिक भोवत्या पार पडल्या. सकाळी जिल्हा परिषद शाळा क्रमांक २, सैतवडे तसेच न्यू इंग्लिश स्कूल, सैतवडे येथील विद्यार्थ्यांनी साक्षरता दिंडी काढून श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरात दर्शन घेतले. विठ्ठलनामाचा गजर, घोषवाक्ये आणि पथनाट्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी साक्षरतेचा संदेश देत उपस्थितांची मने जिंकली.
यानंतर श्री विठ्ठल-रखुमाई भजन मंडळाच्या भजनाने वातावरण भक्तिमय झाले. ह.भ.प. सत्यवान महाराज कदम यांच्या प्रभावी कीर्तनाने भाविकांना अध्यात्माचा संदेश दिला. दुपारच्या सत्रात सिद्धिविनायक भजन मंडळ, वाटद सुतारवाडी तसेच श्री दयानंद मेस्त्री (मेर्वी) यांनी हरिनामाचा अखंड गजर करत वातावरण भक्तिरसाने भारावून टाकले. सायंकाळी बनवाडी महिला मंडळाच्या सुरेल भजनाने कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
रात्री मंदिर प्रदक्षिणेत शेकडो भाविकांनी सहभाग घेतला. “पुंडलिक वरदा हरी विठ्ठल” आणि “श्री ज्ञानदेव तुकाराम” यांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. दिवसभर दर्शनासाठी आलेल्या भाविकांना दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने आणि श्री विठ्ठल-रखुमाई मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
या उत्सवात गावातील ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक, विद्यार्थी आणि बालकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत ग्रामएकता, श्रद्धा आणि भक्तीचे सुंदर दर्शन घडविले. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन आणि आयोजन श्री विठ्ठल-रखुमाई मंडळ, बनवाडी यांनी उत्कृष्टरीत्या पार पाडले.
उपस्थित भाविकांनी मंडळाच्या कार्याचे कौतुक करत गेली ७५ वर्षे अखंड सुरू असलेली ही धार्मिक परंपरा भविष्यातही याच भक्तिभावाने आणि उत्साहाने कायम राहावी, अशी भावना व्यक्त केली.

