(चिपळूण / वार्ताहर)
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सावर्डे येथील डेरवण फाटा परिसरात रविवारी दुचाकी आणि आयशर टेम्पो यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. जखमीला तातडीने डेरवण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच सावर्डे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करत पंचनामा केला असून अपघाताच्या कारणांचा तपास सुरू आहे.
दरम्यान, डेरवण फाटा हा सातत्याने अपघातांचा हॉटस्पॉट ठरत असल्याने स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या ठिकाणी भरधाव वाहनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गतिरोधक उभारण्याची मागणी अनेक दिवसांपासून केली जात आहे. मात्र, संबंधित यंत्रणेकडून अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते केतन पवार यांनी प्रशासनाला इशारा देत, “डेरवण फाट्यावर तातडीने गतिरोधक उभारण्यात यावेत. अन्यथा ग्रामस्थांसह तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा स्पष्ट इशारा दिला आहे.
वारंवार होणारे अपघात, वाढती वाहतूक आणि अपुऱ्या सुरक्षा उपाययोजनांमुळे डेरवण फाटा ‘मृत्यूचा सापळा’ बनत चालल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. आणखी एखादा निष्पाप जीव गमावण्यापूर्वी प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना करून या धोकादायक ठिकाणी सुरक्षिततेची प्रभावी व्यवस्था करावी, अशी जोरदार मागणी परिसरातून होत आहे.

