(रत्नागिरी)
महिलांनी आपल्या कायदेशीर हक्कांविषयी जागरूक राहणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे यांनी केले. तालुका विधी सेवा समिती आणि सह्याद्री तंत्रनिकेतन महाविद्यालय, सावर्डे (ता. चिपळूण) यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांमध्ये कायदेविषयक जागरूकता निर्माण करण्यासाठी आयोजित शिबिरात त्या बोलत होत्या.
या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य मंगेश भोसले, प्राध्यापक लिना जावकर, अॅड. वृषाली सावंत, जिजाऊ ब्रिगेडच्या अनुजा भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डॉ. नेवसे यांनी विद्यार्थिनींना 8 मार्च हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ म्हणून का साजरा केला जातो, याची ऐतिहासिक पार्श्वभूमी समजावून सांगितली. गेल्या सुमारे 120 वर्षांच्या कालखंडात 8 मार्च या दिवशी जगभरातील महिलांनी आपल्या हक्कांसाठी संघर्ष करत न्यायासाठी लढा दिला आहे, असे त्यांनी नमूद केले.
शिबिरात महिलांना भारतीय घटनेने दिलेले अधिकार तसेच महिलांसाठी असलेल्या विविध कायद्यांच्या तरतुदींबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. बदलती जीवनशैली, महिलांपुढे उभ्या राहणाऱ्या गुंतागुंतीच्या समस्या आणि त्या समस्यांवर उपाय म्हणून अस्तित्वात आलेले विविध कायदे, शासनाच्या महिला कल्याण योजना तसेच सर्वोच्च व उच्च न्यायालयांच्या निर्णयांमधील महिलांच्या संरक्षणासंदर्भातील आदेश व मार्गदर्शक तत्त्वे याबाबत माहिती देण्यात आली.
हुंडाबळी, बलात्कार, छेडछाड, विनयभंग, रॅगिंग, लैंगिक छळ, घटस्फोट, द्विभार्या प्रथा, स्त्रीधन आणि स्त्रियांच्या संपत्तीचे प्रश्न, तसेच कौटुंबिक हिंसाचार अशा महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये स्त्री संरक्षण कायदे हे महिलांसाठी प्रभावी मार्गदर्शक ठरतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी हुंडा प्रतिबंधक कायदा, पोटगीसंदर्भातील विविध तरतुदी, मुस्लिम स्त्री संरक्षण कायदा, हिंदू वारसा कायदा, हिंदू दत्तक व भरणपोषण कायदा, गर्भलिंग निदान प्रतिबंध कायदा तसेच कामाच्या ठिकाणी महिलांवरील लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई व निवारण) कायद्यांबाबत सविस्तर माहिती सोप्या भाषेत दिली.
समाजातील सर्व स्तरांतील महिलांमध्ये कायदेविषयक जागरूकता निर्माण झाली तरच विविध संरक्षण यंत्रणांना त्यांना प्रभावीपणे मदत करता येईल, असे मत त्यांनी व्यक्त केले. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थिनींना प्रेरणा देण्यासाठी त्यांनी ‘पंख माया मुक्तीचे सावित्रीबाई फुले’ ही कविता सादर केली.
कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे नियोजन तालुका विधी सेवा समितीचे कनिष्ठ लिपिक श्री. जुगधर तसेच शिपाई श्री. मरके आणि श्री. इंगळे यांनी केले.

