(रत्नागिरी /प्रतिनिधी)
खेडशी-डफळचोळ येथील खापरेवाडी परिसरातील शरद शांताराम खापरे (३६) यांचा प्रकृती खालावल्याने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. ही घटना ८ सप्टेंबर रोजी रात्री ११.४६ वाजता घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, शरद खापरे यांची काही दिवसांपासून प्रकृती ठीक नव्हती. त्यांना लहानपणापासूनच अधूनमधून फिट येण्याचा त्रास असल्याचे त्यांच्या भावाने पोलिसांना दिलेल्या माहितीत नमूद केले आहे. काही दिवसांपासून आजारपण वाढल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. १ सप्टेंबर रोजी प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांनी कारवांचीवाडी फाटा येथील डॉ. पानगले यांच्याकडे तपासणी केली होती. तपासणीदरम्यान छातीत पाणी साचल्याचे निदर्शनास आल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर औषधोपचार सुरू होते.
दरम्यान, ८ सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे १० वाजता त्यांची प्रकृती अधिक खालावली. त्यांची पत्नी श्रावणी खापरे यांनी त्यांना रिक्षाने नाचणे रोडवरील डॉ. सांबरे यांच्याकडे नेले. तेथे प्राथमिक तपासणीनंतर अधिक उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानुसार शरद खापरे यांना सकाळी सुमारे ११ वाजता रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच रात्री ११.४६ वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू क्रमांक ८५/२०२६ अशी करण्यात आली असून, बीएनएसएस कलम १९४ अन्वये पोलिसांकडून आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे. मृत्यूचे नेमके कारण वैद्यकीय तपासणी व संबंधित अहवालातून स्पष्ट होणार आहे.


