(जाकादेवी / संतोष पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या बळीराम परकर विद्यालयात शिकणारा इयत्ता ६ वी (अ) चा विद्यार्थी कु. संगम सुयोग चव्हाण याने नुकत्याच झालेल्या शालेय राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून संपूर्ण रत्नागिरीचा मान उंचावला आहे. कमी वयात मिळवलेले हे उल्लेखनीय यश साजरे करण्यासाठी विद्यालय आणि शिक्षण संस्थेच्या वतीने मंगळवार, दि. ४ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता मालगुंड येथे भव्य मिरवणूक आणि सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
या प्रेरणादायी कार्यक्रमासाठी संस्थेचे पदाधिकारी, संचालक, सल्लागार, निमंत्रित संचालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
नागालँड येथे पार पडलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत संगमने आपल्या कौशल्य, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर सुवर्णपदक पटकावले. त्याच्या या कामगिरीबद्दल विद्यालय, संस्थेचे चेअरमन सुनिल (बंधू) मयेकर, मुख्याध्यापक बिपीन परकर, मार्गदर्शक प्रशिक्षक रूपेश तावडे, तसेच सर्व शिक्षक व पालक वर्गाकडून अभिमान व्यक्त करण्यात आला आहे.
चेअरमन मयेकर यांनी म्हटले आहे की, “संगम चव्हाणच्या कामगिरीने मालगुंड एज्युकेशन सोसायटीचा आणि रत्नागिरी जिल्ह्याचा अभिमान द्विगुणीत झाला आहे.”
राष्ट्रीय स्पर्धेपूर्वीच मालगुंड शिक्षण संस्थेने संगम चव्हाण आणि प्रशिक्षक रूपेश तावडे यांचा प्रेरणादायी मिरवणूक व सत्कार केला होता. आता सुवर्णपदकाचा मानकरी ठरल्यानंतर त्यांच्या सन्मानार्थ आणखी भव्य मिरवणूक आणि स्फूर्तीदायक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शिक्षणप्रेमी, क्रीडाप्रेमी, माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी या सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्याध्यापक बिपीन परकर यांनी केले आहे.

