(रत्नागिरी)
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘क्रांतीची धगधगती ज्वाला!’ या विशेष संगीत, नृत्य आणि नाट्यमय कार्यक्रमाचे आयोजन बुधवार, दि. १५ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता मराठा भवन हॉल, जिल्हा परिषदेजवळ, माळनाका, रत्नागिरी येथे करण्यात आले आहे.
या कार्यक्रमातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या राष्ट्रभक्ती, क्रांतिकारी विचार, साहित्यसंपदा आणि समाजसुधारणेच्या कार्याचा प्रभावी कलात्मक आविष्कार रसिकांसमोर सादर केला जाणार आहे.
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील तेजस्वी क्रांतिकारक, प्रखर राष्ट्रवादी विचारवंत, साहित्यिक, कवी आणि समाजसुधारक म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे स्थान अढळ आहे. राष्ट्रभक्ती, सामाजिक समता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि राष्ट्रीय स्वाभिमान या मूल्यांचा त्यांनी आयुष्यभर पुरस्कार केला. त्यांचे विचार आणि कार्य नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचावे, या उद्देशाने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे लेखन डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी केले असून निवेदन प्रदीप तेंडुलकर करणार आहेत. सोनम जाधव व सहकारी, मुग्धा गावकर (गोवा), राम तांबे, मीरा खालगावकर-जोशी व सहकारी यांच्यासह अनेक नामवंत कलाकार संगीत, नृत्य आणि नाट्याच्या माध्यमातून सावरकरांच्या जीवनातील विविध प्रेरणादायी प्रसंग साकारतील. चैतन्य पटवर्धन (ऑर्गन) आणि केदार लिंगायत (तबला) यांची साथसंगत कार्यक्रमाला लाभणार आहे.
या कार्यक्रमात सावरकरांचे बालपण, स्वातंत्र्यलढ्यातील योगदान, अंदमानातील सेल्युलर कारागृहातील संघर्ष, रत्नागिरीतील समाजसुधारणेचे कार्य, साहित्यनिर्मिती आणि अखंड राष्ट्रनिष्ठेचा प्रेरणादायी प्रवास संगीत, नृत्य, नाट्य आणि निवेदनाच्या माध्यमातून उलगडला जाणार आहे. त्यांच्या विचारांचे आजच्या काळातील महत्त्व अधोरेखित करत राष्ट्रभक्तीची प्रेरणा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून करण्यात येणार आहे.
हा कार्यक्रम महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विकास मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. राज्याच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे जतन व संवर्धन करण्याबरोबरच राष्ट्रपुरुषांचे विचार आणि कार्य समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग विविध उपक्रम सातत्याने राबवत आहे.
या कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असून नागरिक, विद्यार्थी, इतिहासप्रेमी, साहित्यप्रेमी, कलाकार आणि रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या प्रेरणादायी सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.

